अमरावती: निसर्गाने कुणाला काय द्यावे हे आपल्या हातात नसते. मात्र कधी कधी अनपेक्षित आघात जन्माला येणाऱ्या मुलांवर होतो. अशावेळी बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून निश्चितच भविष्यातील परावलंबित्वाच्या पाशातून श्रवणदोष असलेल्या चिमुकल्यांची मुक्तता करता येणे शक्य आहे. यातून नुसती ही मुलेच उभी राहत नाहीत, तर पर्यायाने ते घर आणि समाजही घडतो. ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा त्यापैकीच एक प्रयत्न आहे. येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) सातवी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
जन्मतः श्रवणदोष
साडेचार वर्षांच्या जन्मतः श्रवणदोष असलेल्या बालकावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असलेल्या या बालकाच्या कुटुंबीयांना समाजमाध्यमांद्वारे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बालकाला रुग्णालयात आणून रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी व ईएनटी सर्जन डॉ. मंगेश मेंढे यांची भेट घेतली. आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर बालकावर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमरावती जिल्हा नियोजन समिती आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
या शत्रक्रियेनंतर त्या बालकाला नव्या ऐकू येणाच्या जगाची दारे खुली झाले आहेत. ही शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथील कान-नाक-घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी आणि विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे ईएनटी सर्जन डॉ. मंगेश मेंढे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.
चमूचे मोठे योगदान
सदर शस्त्रक्रियेमधे भूलतज्ञ डॉ. चेतन रोंघे, डॉ.बाळकृष्ण बागवाले, डॉ अश्विनी मढावी, ऑडियोलॉजिस्ट लक्ष्मण मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ उज्वला मोहोड, समाजसेवा अधीक्षक शीतल बोंडे, ऋषिकेश धस, महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधील डॉ पायल रोकडे, डॉ दिव्यांनी मुंदाने, रजत हूमने, फार्मासिस्ट योगेश वाडेकर, बायोमेडिकल इंजीनियर शुभम बैरागडे, अधिसेविका चंदा खोडके, मालती प्रधान, इंचार्ज सिस्टर अलका मोहोड, सुनिती हरणे, वैशाली नगराळे, दीपिका वाठोडकर, कल्याण नगराळे, राहुल वायझाडे, शुभम गवई, अभिषेक निचत, यश गवई, यश घुगल, पुष्पा तायडे, लक्ष्मी सरडे, शुभांगी टिंगणे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचे शस्त्रक्रियेत मोलाचे सहकार्य होते.
