नागपूर : सोशल मीडियावर व्यंगात्मक स्वरूपात चर्चेत आलेली ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचे चित्र नागपुरात पाहायला मिळाले. संविधान चौकात मंगळवारी झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले. रोजगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आयोजित या आंदोलनात ‘आझादी’ आणि ‘लाल सलाम’च्या घोषणाही ऐकू आल्याने चळवळीच्या वैचारिक स्वरूपाबाबत चर्चा रंगू लागली आहे. यावेळी मात्र तरुणांना आजादी कुणापासून हवी? हे स्पष्ट झाले नाही.
नागपुरातील आंदोलनात नेमके काय घडले?
संविधान चौकात झालेल्या आंदोलनात हजारो युवक-युवती आणि नागरिक सहभागी झाले. आयोजकांच्या मते, साडेचार ते पाच हजारांहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. रोजगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांतील विविध समस्यांकडे लक्ष वेधणे हा आंदोलनाचा प्रमुख उद्देश होता.
आंदोलनात आझादीवर कोणते नारे लागले ?
आंदोलन स्थळी डफळी वाजवत काही तरुणांनी काही वर्षांपूर्वी जे. एन. यु. मध्ये लागलेल्या आझादीच्या घोषणांसारख्याच घोषणा दिल्या. घोषणांमध्ये ‘तरुण मांगे आझादी… महिलाएं मांगे आझादी…. अंदर मांगे आजादी… बाहर मांगे आझादी… सड़क पर मांगे आझादी… हक है हमारा आझादी… जान से प्यारी आझादी…. जो तुम ना दोगे आझादी, हम छीन के लेंगे आझादी… मोदी सुन ले आझादी, फडणवीस सुन ले आझादी, तुम पुलिस बुला लो, हमें जेल में डालो, चाहे डंडे मारो, पर हम छीन के लेंगे आझादी…. हम नहीं रुकेंगे आझादी… नागपुर मांगे आझादी…. विदर्भ मांगे आझादी…. हक है हमारा आझादी…. या घोषणांचा समावेश होता.
कोणत्या मान्यवरांनी आंदोलनात उपस्थिती दर्शविली?
वर्धा येथील फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीचे संचालक नीलेश कराळे यांनी स्पर्धा परीक्षार्थी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडली. तसेच सामाजिक प्रबोधनासाठी ओळखले जाणारे सत्यपाल महाराज यांनीही उपस्थित राहून युवकांच्या भावना जाणून घेतल्या.
‘लाल सलाम’च्या घोषणांमुळे चर्चा का सुरू झाली?
आंदोलनादरम्यान काही ठिकाणी ‘लाल सलाम’च्या घोषणा देण्यात आल्याचे दिसून आले. भारतात ही घोषणा परंपरेने कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि डाव्या विचारांच्या चळवळींशी संबंधित मानली जाते. त्यामुळे या घोषणांच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या वैचारिक स्वरूपाबाबत चर्चा सुरू झाली.
‘लाल सलाम’ म्हणजे काय?
‘लाल सलाम’ हे अभिवादन किंवा ऐक्य व्यक्त करणारे घोषवाक्य मानले जाते. लाल रंग हा कामगार, शेतकरी आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींचे प्रतीक मानला जात असल्याने डाव्या विचारसरणीच्या विविध संघटनांकडून या घोषणेचा वापर केला जातो.
याचा अर्थ आंदोलन एखाद्या विशिष्ट विचारसरणीशी जोडले गेले आहे का?
आंदोलनाला विविध संघटना आणि गटांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अशा घोषणा देण्यात आल्या असाव्यात, असे काहींचे मत आहे. तर आंदोलनातील प्रमुख मुद्दे हे रोजगार, शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांशी संबंधित असल्याचे आयोजक सांगत आहेत.
या आंदोलनाचे वैशिष्ट्य काय मानले जात आहे?
सोशल मीडियावरून सुरू झालेली एक व्यंगात्मक संकल्पना प्रत्यक्ष रस्त्यावर मोठ्या संख्येने युवकांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरल्याचे या आंदोलनातून दिसून आले. विशेषतः बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांबाबत तरुणांमध्ये असलेली अस्वस्थता या निमित्ताने समोर आली.
