अकोला : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेच्या समन्वयाने दक्षिण रेल्वेने कोयंबतूर–जयपूर–कोयंबतूर दरम्यान विशेष साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला. विशेष गाड्यांनाही मुदतवाढ दिली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रेल्वे प्रवाशांना आरक्षण उपलब्ध होत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

विशेष गाडीच्या प्रत्येकी नऊ फेऱ्या होणार

गाडी क्रमांक ०६१८१ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ही गाडी दर गुरुवारी कोयंबतूर येथून पहाटे ०२.३० वाजता सुटेल व शनिवारी दुपारी १३.२५ वाजता जयपूर येथे पोहोचेल. या कालावधीत एकूण ९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक एक्सप्रेस विशेष ही गाडी १२ एप्रिल ते ०७ जून या कालावधीत दर रविवारी रात्री २२.०५ वाजता जयपूर येथून सुटेल व बुधवारी सकाळी ०८.३० वाजता कोयंबतूर येथे पोहोचेल. या गाडीच्या देखील ९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाडीमध्ये एकूण २० एलएचबी डबे असतील, ज्यामध्ये १८ वातानुकूलित थ्री-टियर डबे व २ लगेज-कम-ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. ही गाडी विद्युत इंजिनाद्वारे चालविण्यात येईल.

राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांशी थेट रेल्वेने संपर्क

ही गाडी तिरुप्पूर, इरोड, सालेम, कटपडी, रेणीगुंटा, काचीगुडा, निजामाबाद, बासर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, गोधरा, रतलाम, नीमच, चीतौरगढ , अजमेर मार्गे धावेल. नांदेड विभागात ही गाडी मुदखेड, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम आणि अकोला या स्थानकांवर थांबणार असून, या भागातील प्रवाशांना राजस्थान, गुजरात, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांशी थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.

अकोला – तिरुपती विशेष गाडीला मुदतवाढ

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता तसेच प्रवाशांना अधिक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची एक फेरी वाढविण्याच्या निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या विद्यमान थांबे, वेळापत्रकासह चालवल्या जाणार आहेत. गाडी क्रमांक ०७६०६ अकोला-तिरुपती विशेष गाडी रविवारी धावणार असून तिची सेवा १२ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.