गोंदिया ६.५, नागपूर ७.२ अंश सेल्सिअस

नागपूर व गोंदिया जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली थंडीची लाट  शुक्रवारी अधिक तीव्र झाली. डिसेंबर २०१६ मध्ये १८ तारखेला ७.७ अंश सेल्सिअस इतकी कमी तापमानाची नोंद झाली होती. जानेवारी २०१७ च्या पूर्वार्धात शुक्रवारी ७.२ अंश सेल्सिअस इतकी कमी तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात ६.५ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवण्यात आले. शहरातील तापमानाचा पारा वेगाने खाली येत असून नागपूरकरांनी दिवसभर उबदार कपडय़ातच राहणे पसंत केले.

उत्तरेकडे सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भासह संपूर्ण मध्यभारतात थंडीचा कडाका जाणवत आहे. उत्तर भारतातील अनेक शहरे बर्फाने झाकोळली गेली आहेत. त्याचा परिणाम विदर्भासह संपूर्ण मध्यभारतात झाला आहे. गारठय़ामुळे  शहरातील तापमान वेगाने खाली येत आहे. विशेष म्हणजे किमान तापमानासह कमाल तापमानातही घसरण झाली आहे. बुधवारी १२.८ अंश सेल्सिअसवर असलेला पारा गुरुवारी ८.६ अंश सेल्सिअसवर आला. चोवीस तासात तब्बल चार ते पाच अंशाने पाऱ्यात घसरण झाली. त्यानंतर उपराजधानीत शुक्रवारी सकाळी ७.२ अंश सेल्सिअस इतकी निच्चांकी तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने दोन दिवस विदर्भासह मध्यभारतात कडाक्याची थंडी राहील, असे सांगितले होते. बुधवारपासूनच वातावरणात गारठा जाणवत होता आणि गुरुवारी आणखी वाढला. दिवसभर गार आणि बोचऱ्या वाऱ्यांनी नागपूरकर हैराण झाले होते. अनेकजण अगदीच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडत होते. कित्येकांनी घरी राहणेच पसंत केले. रात्री थंडी अधिकच बोचरी झाल्याने एरवी वर्दळीच्या रस्त्यावरची वाहतूकसुद्धा रात्री नऊ वाजतापासूनच कमी झालेली जाणवत होती.

नागपूरपेक्षा गोंदिया जिल्ह्यातील तापमान अधिक कमी असून गोंदियात ६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. विदर्भासह मध्य भारतात थंडीची लाट कायम राहणार असून दरम्यानच्या काळात थंडीचा प्रकोप आणखी जाणवणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. थंडीच्या या कडाक्यामुळे नागपूरकरांना चांगलीच हुडहुडी भरली असून उघडय़ावर राहणाऱ्यांचे जगणे आणखीच कठीण झाले आहे. सध्या शहरात मेट्रो रेल्वे आणि सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे कामगारांनी फुटपाथवरच त्यांच्या झोपडय़ा उभारल्या आहेत. थंडीचा आघात त्यांना अधिक सहन करावा लागत आहे. शेकोटय़ा हाच त्यांचा एकमेव आधार आहे.