scorecardresearch

१९६० व्यापारी-निवासी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा नाही; महापालिकेच्या नोटीसकडे दुर्लक्ष, नागरिकांच्या जीवाला धोका

खाली व्यापारी गाळे आणि वरती निवासी संकुले असलेल्या शहरातील तब्बल १९६० हून अधिक इमारतींमध्ये अग्नि प्रतिबंधक उपाययोजना नाहीत.

नागपूर : खाली व्यापारी गाळे आणि वरती निवासी संकुले असलेल्या शहरातील तब्बल १९६० हून अधिक इमारतींमध्ये अग्नि प्रतिबंधक उपाययोजना नाहीत. अग्निशमन विभागाने या इमारतींना नोटीस देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. गेल्या आठवडय़ात दिल्लीतील अशाच एका इमारतीला लागलेल्या आगीत २७ लोक मृत्युमुखी पडले होते. शहरातही यंदा मार्चपासून आतापर्यंत आगींच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर निवासी संकुलात राहणाऱ्यांची आग प्रतिबंधासंबंधीची अनास्था धोकादायक ठरणारी आहे.

शहरातील पूर्व, मध्य व दक्षिण नागपूरसह इतरही भागात अनेक इमारतींमध्ये खाली व्यापारी गाळे आणि  वरती निवासी संकुले आहेत. काही व्यावसायिक गाळय़ांमध्ये छोटे उद्योग आहेत व तेथे ज्वलनशील पदार्थाचा वापर केला जातो. तसेच अनेक इमारतीत गॅस एजन्सी आहेत व तेथे भरलेले सिलिंडर ठेवले जातात. अशा इमारतींना अग्निशमन यंत्रणा लावणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून नियमितपणे याबाबत सर्वेक्षण केले जाते. त्रुटी असलेल्या इमारतींना नोटीस बजावली जाते. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. मागील वर्षी गजबजलेल्या इतवारी परिसरात निवासी इमारतीला आग लागली होती. त्यात प्लास्टिक वस्तूचे गोदाम होते. तरीही या भागातील स्थिती ‘जैसे-थे’च आहे.

परिपूर्णता प्रमाणपत्राकडे पाठ

खरे तर इमारत बांधकाम सुरू करताना अग्निशमन विभागाकडून विकासकाला इमारतीमध्ये होस पाईप, स्प्रिंकलर, एक्टिग्युशरसह पाण्याचे टाके व इतर सुविधा तयार करण्यास सांगितले जाते. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विकासक परिपूर्ण प्रमाणपत्रासाठी अग्निशमन विभागाकडे येत नाही. २०१३ ते २०२० पर्यंत २ हजार ७९० इमारतींसाठी अग्निशमन विभागाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले मात्र त्यापैकी केवळ ८३० जणांनी परिपूर्णतेचे प्रमाणपत्र घेतले. इतरांवर अद्याप कारवाई झाली नाही.

अग्निशमन नियंत्रण यंत्रणा नसलेल्या निवासी व व्यावसायिक वापराच्या इमारतींना नोटीस देण्यात आल्या आहेत. ज्यांनी इमारतीचे परिपूर्णता प्रमाणपत्र घेतले नाही, अशा इमारतींची माहिती घेतली जात आहे. विभागाकडून १९८९ पासून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देणे सुरू आहे. मात्र, त्या आधीच्या इमारतींची संख्या अधिक आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र बंधनकारक नसल्यामुळे अशा इमारतींवर कारवाई करता येत नाही.’’

– राजेंद्र उचके, अग्निशमन अधिकारी, महापालिका.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Commercial residential buildings fire extinguishers ignoring notice municipal corporation citizens ysh

ताज्या बातम्या