चंद्रशेखर बोबडे, लोकसत्ता

नागपूर : देशात करोनाच्या पहिल्या लाटेच्या (२०१९-२०) तुलनेत दुसऱ्या लाटेवेळी (२०२०-२१) सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) खर्च करणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत आणि रकमेतही घट झाल्याचे केंद्रीय कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाच्या नोंदीतून स्पष्ट झाले आहे. सीएसआर खर्चात घट होण्यामागे करोना निर्बंध हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते.

देशात २०१९-२० मध्ये २२,६६४ कंपन्यांनी २४,८६३ कोटी रुपये ‘सीएसआर’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांवर खर्च केले होते. त्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ८,६३३ कंपन्यांनी २०,३६०.२५ कोटी रुपये खर्च केल्याची नोंद आहे.

पाचशे कोटींहून अधिक आर्थिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना त्यांना होणाऱ्या नफ्यातून काही रक्कम सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे. करोनाकाळात अनेक कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर निधीतून आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी खर्च केला होता. २०२०-२१ मध्ये यात घसरण झाल्याचे आढळते. यामागे करोनाकाळातील निर्बंध हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. निर्बंधामुळे अनेक कंपन्यांना वार्षिक सर्वसाधारण सभा घेता आली नाही. या सभांमध्ये कंपन्यांचा नफा आणि तत्सम तपशील सादर केला जातो. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे माजी अध्यक्ष अतुल पांडे यांनी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘२०१९-२० या आर्थिक वर्षांत कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर निधी खर्चाचा तपशील सरकारकडे दिला होता. त्यामुळे या वर्षांत निधी आणि कंपन्यांची संख्या अधिक दिसते; परंतु २०२०-२१ मध्ये करोनाचा प्रादुर्भाव अधिक होता. या काळातही कंपन्यांनी त्यांचा सीएसआर निधी खर्च केला; पण त्यांचा तपशील सरकारकडे सादर करण्यास विलंब झाला असावा. म्हणून रक्कम कमी दिसते; परंतु २०१९-२० पेक्षा ती अधिक आहे.  ‘विदर्भ डिफेन्स असोसिएशन’चे संयोजक दुष्यंत देशपांडे म्हणाले की, करोना काळामुळे अनेक कंपन्यांच्या आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला.  उत्पन्न पाहूनच सीएसआर निधी खर्च करण्याचा कंपन्याचा विचार आहे.

२०१९-२०च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये सीएसआर निधी खर्चाचे प्रमाण कमी दिसत असले तरी प्रत्यक्षात ते अधिक आहे. अनेक कंपन्यांचा तपशील सरकारकडे पोहोचला नाही. ती प्रक्रिया सुरू आहे.

– अतुल पांडे, माजी अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, नागपूर</strong>

खर्चाचा तपशील

वर्ष           कंपन्या        निधी (कोटीत)

२०१९-२०       २२,    ६६४          २४,८६३.८४

२०२०-२१       ८,     ६३३          २०,३६०.२५