scorecardresearch

इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात पशुवैद्यक विद्यार्थ्यांना आंतरवासितेसाठी तुटपुंजे मानधन

पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या(माफसू) मुंबई, नागपूर, उदगीर, सातारा आणि परभणी येथील महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना ‘आंतरवासिता’साठी मिळणारे मानधन इतर राज्यांच्या तुलनेत तुटपुंजे आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सरकारच्या धोरणाविषयी नाराजी ,  राज्यव्यापी आंदोलन

नागपूर : पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या(माफसू) मुंबई, नागपूर, उदगीर, सातारा आणि परभणी येथील महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांना ‘आंतरवासिता’साठी मिळणारे मानधन इतर राज्यांच्या तुलनेत तुटपुंजे आहे. एकीकडे राजस्थान, हरियाणा, बिहार येथील विद्यार्थ्यांना ‘आंतरवासिते’साठी पंधरा ते सोळा हजारांचे मानधन दिले जात असताना महाराष्ट्र सरकारकडून ‘माफसू’च्या विद्यार्थ्यांना केवळ ७५०० रुपये मानधन मिळत असल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांनी  सरकारच्या धोरणाचा विरोध होत आहे. 

पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून आंतरवासिता भत्ता वाढवून देण्चाची मागणी केली जात आहे. २०१६ मध्ये तत्कालीन केंद्रीय पशुपालन व मत्स्यपालन राज्यमंत्री संजीवकुमार बलयान यांनी नागपुरात आंतरवासिता भत्ता पंधरा हजार रुपये प्रति महिना करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, यातील ५० टक्के रक्कम भारतीय कृषी संशोधन परिषद व ५० टक्के रक्कम राज्य शासन देईल असे स्पष्ट केले होते. मात्र, अद्यापही मानधनात वाढ झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.

‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडावर आधारित आहे. आंतरवासिता मानधनातील ५० टक्के रक्कम भारतीय कृषी संशोधन परिषद व ५० टक्के रक्कम राज्य शासनाकडून दिली जाते. यानुसार राजस्थान सरकारने मानधनची रक्कम १४ हजार रुपये केली. तर हरियाणामध्ये १७ हजार रुपये दिले जातात. मात्र, असे असतानाही महाराष्ट्र शासनाकडून येथील विद्यार्थ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शासनाने मानधन वाढ करून किमान पंधरा हजार रुपये करावी अशी मागणी होत आहे.

आंतरवासिता..

नियमानुसार पशुवैद्यकीय पदवी नवीन अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांतील विद्यार्थ्यांना एक वर्षांची आंतरवासिता करणे आवश्यक आहे.  यातील सहा महिने राज्यात तर सहा महिने राज्याबाहेर करायची असते. या अनुषंगाने अंतिम वर्षांतील नागपूर, उदगीर, सातारा, परभणी, मुंबई येथील विद्यार्थी आंतरवासितासाठी शासकीय दवाखाने, पशुवैद्यकीय उपचार केंद्र, संशोधन केंद्र आदी ठिकाणी जातात.  पशुवैद्यक महाविद्यालयात शिक्षण घेणारे बहुसंख्य विद्यार्थी शेतकरी अल्पभूधारक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असतात. परंतु त्यांना मिळणारे मानधन अत्यल्प असल्याने घराबाहेर राहून आंतरवासिता पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागते.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Compared other states maharashtra pays meager honorarium veterinary students ysh