नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्दात समाजमाध्यावर टीका केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मराठी मालिका अभिनेत्री केतकी चितळेविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरात दोन वर्षे जुन्या फेसबुक पोस्टवरून गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार केली आहे. या पोस्टमुळे भावना दुखावल्याचे सांगून केतकीविरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. यावरून राष्ट्रवादीला उशिरा शहाणपण सुचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

केतकी चितळे हिने समाजमाध्यावर कवितेद्वारे शरद पवार यांच्यावर अत्यंत वाईट भाषेत टीका केली. याप्रकरणी तक्रारीनंतर तिला अटक करण्यात आली. यानंतर केतकी चितळे हिच्या दोन वर्षे जुन्या फेसबुक पोस्टचा हवाला देत नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महासचिव वर्षां शामकुळे यांनी तक्रार दाखल केली. ‘नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात’, अशी फेसबुक पोस्ट केतकीने १ मार्च २०२० ला केली होती. या पोस्टमुळे बौद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे केतकी चितळेवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी वर्षां शामकुळे यांनी केली आहे.

राज्य महिला आयोगाकडे तक्रार

आंबेडकर विचार मंचच्या संयोजिका अलकाताई कांबळे यांनी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली आहे. केतकीने शरद पवारांबाबत केलेल्या पोस्टमागे समाजात तेढ निर्माण करणे आणि राजकीय दंगल घडवण्याचा हेतू दिसतो. यामुळे केतकीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर विचार मंचच्या शिष्टमंडळाने चाकनकर यांच्याकडे केली आहे.