scorecardresearch

१२ आठवड्यांपेक्षा अधिक करोना प्रभावामुळे गुंतागुंत

१२ आठवड्यांपेक्षा अधिक काळ कोविड संसर्ग राहणे वा त्यावरील उपचार सुरू राहणे हे कोविड पश्चात गुंतागुंतींचे प्रमुख कारण आहे.

१२ आठवड्यांपेक्षा अधिक करोना प्रभावामुळे गुंतागुंत
(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नागपूर : १२ आठवड्यांपेक्षा अधिक काळ कोविड संसर्ग राहणे वा त्यावरील उपचार सुरू राहणे हे कोविड पश्चात गुंतागुंतींचे प्रमुख कारण आहे. अशा रुग्णांमध्ये पेशींची हानी होणे, चव, गंध ओळखणाऱ्या संवेदनांची कमी होणे, पेशींना सूज येणे, मधुमेहाशी निगडित गुंतागुंत वाढणे आदी ६२ प्रकारच्या गुंतागुंत नोंदवण्यात आल्या आहेत. या शिवाय केस गळणे, वारंवार थकवा येणे, आवाजात बदल होणे, भीती, नैराश्य अशा लक्षणांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आल्याचे डॉ. देवेंद्र अग्रवाल यांनी सांगितले.

करोनाच्या महामारीनंतर विविध प्रकारे शारीरिक, मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून अशा सर्व घटकांबाबत आजच्या ‘कोविड १९ संसर्गाचे दीर्घकालीन परिणाम’ या विषयावरील परिसंवादात अभ्यासपूर्ण चर्चा झाली. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या गणित विभागाच्या श्रीनिवास रामानुजन सभागृहात हे चर्चासत्र पार पडले. राकेश अग्रवाल अध्यक्षस्थानी होते. या चर्चासत्रात डॉ. देवेंद्र अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात उद्भवणाऱ्या वैद्यकीय जटीलतांविषयी आढावा’, डॉ. तन्वी सिंघल यांनी ‘कोविडनंतर उद्भवणारे दुय्यम संसर्ग’, डॉ. विद्यालक्ष्मी सेल्वराज यांनी ‘कोविड पश्चात मानसिक आरोग्य’ तर डॉ. विनीत अग्रवाल यांनी ‘कोविड पश्चात हृदयक्रियांमधील जटीलता’, याविषयी आपले शोधनिबंध सादर केले.

हेही वाचा >>> इंडियन सायंन्स कॉंग्रेसमध्ये आज काय-काय? टीना अंबानी येणार, कृषी विज्ञानावरही मंथन

डॉ. तनु सिंघल यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात दुय्यम संसर्गांविषयी अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यांनी सांगितले की, कोविड उपचारादरम्यान अधिक काळ अतिदक्षता विभागात दाखल असणे, कृत्रिम श्वसनावर अवलंबून असणे, त्यासाठी वापरलेला ऑक्सिजन सदोष असणे, अस्वच्छता आदी कारणांमुळे हे संसर्ग विकसित होतात. त्यात काळी बुरशी सारखा संसर्ग, न्युमोनिआ, मूत्रमार्गातील संसर्ग, रक्तमार्गातील संसर्ग इ. संसर्गांचा समावेश होतो. उपचारादरम्यान असे लक्षात येते की, रुग्णाला जरी कोविड संसर्ग झाला असला तरी प्रत्यक्षात त्याआडून अन्य संसर्ग विकसित होतात आणि रुग्ण अत्यवस्थ होतो.

हेही वाचा >>> एका अपघाताने बदलले विद्यार्थ्याचे आयुष्य, चालकाला डुलकी लागण्यापासून सावध करणारे ‘स्मार्ट कार मॉडेल’ बनवले

डॉ. विजयलक्ष्मी सेल्वराज यांनी आपल्या शोधनिबंधात मांडले की, कोविड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अभुतपूर्व परिस्थिती उदा. लॉकडाऊन, जवळच्या नातेवाईकांचे मृत्यू, आजारपण, संसर्गाच्या भितीने त्यांची सुश्रुषा करता न येणे तसेच अन्य कारणांमुळे सामाजिक वातावरणात बदल घडले. या परिस्थितीमुळे लोकांना एकलकोंडेपणा, भय अशा मानसिक घटनांना सामोरे जावे लागले. अनेक लोक व्यसनांना बळी पडले. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. उपचारानंतर बरे झाल्यानंतरही नैराश्य, तणाव, भीती, निद्रानाश, लैंगिक समस्या अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 10:00 IST

संबंधित बातम्या