यवतमाळ : ‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जात असले तरी समाज माध्यमे आल्यापासून ‘समाज’ वाचनापासून दूर चालला आहे. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद राहिले नाही. हातातील पुस्तके अडगळीत जाऊन, मोबाईलने मनुष्याचे भावविश्व व्यापले आहे. अशा काळात शिक्षण क्षेत्रात वाचन संस्कृती जोपासली जावी आणि शिक्षकांच्या आकलन क्षमतेचा विकास व्हावा, या उद्देशाने शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ‘समजपूर्वक वाचन’ स्पर्धा घेण्यात आली.

येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) येथे शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील आठही शैक्षणिक विभागांतून ३७ स्पर्धक उपस्थित होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता तथा प्रसिद्ध कवी पुनीत मातकर यांनी स्पर्धकांशी संवाद साधताना वाचन कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनात वाचन हे केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून विषयाची गोडी निर्माण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. भाषेचे विविध पैलू आणि त्याचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धेचे जिल्हा समन्वयक आणि अधिव्याख्याता धम्मरत्न वायवळ यांनी या स्पर्धेची संकल्पना स्पष्ट केली. तालुका आणि विभाग स्तरावरून निवड होऊन आलेल्या स्पर्धकांच्या सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले. संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकांना अष्टपैलू होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात वैचारिक नाते निर्माण होण्यासाठी वाचन आवश्यक आहे. शिक्षकाने सातत्याने विविध विषयांची पुस्तके वाचली पाहिजेत, जेणेकरून वर्गात शिकवताना आपण ज्ञानाचा अधिक सखोल साठा विद्यार्थ्यांसमोर मांडू शकू.

परीक्षकांनी परीक्षण केल्यानंतर पहिल्या १० विजेत्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, तर इतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन यवतमाळ येथे व्हावे, अशी भावना अनेक स्पर्धकांनी बोलून दाखवली. सध्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये असंख्य शाळाबाह्य कामे असल्याने अध्ययन आणि अध्यापन कार्यात न्याय देता येत नसल्याची भावना शिक्षकांनी बोलून दाखवली. वाचन कमी होत असताना शासनाकडून शिक्षकांच्या समजपूर्वक वाचनावर भर दिला गेल्याने शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. वनिता ठाकरे यांनी केले. या सोहळ्यासाठी प्राचार्य डॉ. रमेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मरत्न वायवळ, पुनीत मातकर, अर्चना मनोहर, मंगला मुंडाले, प्रकाश माहुरे, दीपक सोनुणे, नागसेन सोमकुवर आणि अधीक्षक निलेश गुल्हाणे यांनी सहकार्य केले.