मागण्या महिनाभरात सोडविण्याचे पंकजा मुंडेंचे आश्वासन

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना न्याय मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून टेकडी मार्गावर ठाण मांडून बसलेल्या संगणक परिचारकांच्या मागण्या येत्या महिन्याभरात सोडविण्याचे आश्वासन ग्रामविकास व महिला बाल विकास कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी मोर्चाला सामोरे येऊन दिल्यानंतर अखेर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. राज्यातील विविध गावातून आलेले संगणक परिचारक आपपल्या गावी परतले. सरकारने दिलेले आश्वासन जर पाळले नाही तर अशाच पद्धतीचे आंदोलन महाराष्ट्रात पुन्हा करू आणि सरकारला पायउतार करू असा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला.

राज्यातील संग्राम प्रकल्पातील संगणक परिचारकांनी देशात ई पंचायत मध्ये सलग तीन वर्षे राज्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्याचे काम केले आहे. राज्यात २७ हजार ग्रामपंचायत असून त्या ठिकाणी काम करीत असलेल्या परिचारकांना शासकीय सेवेत घेण्यात आले नाही किंवा त्यांचे मानधन वाढविण्यात आले नाही. त्यामुळे शासकीय सेवेत घेऊन किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे,  अशी मागणी करीत संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे सात दिवसांपूर्वी संगणक परिचारकांचा मोर्चा विधानभवनावर धडकल्यानंतर तो ठाण मांडून बसला होता. अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असताना पंकजा मुंडे मोर्चासमोर आल्या आणि त्यांना मोर्चेकऱ्यांना संग्राम प्रकल्प दोनमध्ये सर्व परिचारकांना सहभागी करून वाढीव मानधन देण्यात येईल आणि त्याबाबत १५ जानेवारीपर्यंत आदेश काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर अखेर परिचारकांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले आणि सात दिवसांपासून ठाण मांडून बसलेला मोर्चातील परिचारक आपल्या गावी परतले आणि सुरक्षेला असलेल्या शेकडो पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.  विधिमंडळाचे अधिवेशन उद्या बुधवारी संपणार असल्यामुळे मोर्चाची संख्या कमी झाली असून मंगळवारी केवळ तीन संघटनाचे मोर्चे विधानभवनावर धडकले. किन्नर समाजाने काढलेल्या मोर्चात जिल्ह्य़ातील विविध भागातील तृतीयपंथी सहभागी झाले होते. यावेर्ळी त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध केला.

किन्नर सर्व समाज विकास संस्था

नेतृत्व-  उत्तम बाबा सेनापती, अनिता मडावी, विद्या कांबळे, शहनाज गुरू, सपना दीदी

मागण्या- किन्नर समाजाला विधानसभा आणि विधान परिषदेत प्रतिनिधित्व देण्यात यावे, समाजाने तिसरा दर्जा दिलेल्या किन्नर समाजाला सन्मान मिळावा, समाजात व्यवसाय करणाऱ्या किन्नर समाजाला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी, निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,दलितांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्यांचा प्रकरणाचा द्रूतगती न्यायालयातून निकाल लावावा व शिक्षा द्यावी.

महाराष्ट्र सराफा सुवर्णकार महामंडळ

नेतृत्व – पुरुषोत्तम कावळे, रोकडे, फुले.

मागण्या – सोनेतारण ठेवून घेतलेले कर्ज या योजनेतून काढून टाकावे, विदर्भातील सर्व सराफा- सुवर्णकार परवानाधारक सावरकारांवर फौजदारी गुन्हा दाखल करु नये, कर्जमाफीची मुदत १ एप्रिल १४ ते ३० नोव्हेंबर १४ पर्यंत असावी, परवाना एक वर्षांसाठी नसून पाच वर्षांसाठी असावा, सावकारांकडे तारण असलेली वस्तू तोडमोड करण्याची परवानागी एक वर्षांनंतर असावी, परवानाधारकांना व्याजदर २४ टक्के वार्षिक असावा.

अनसूचित जनजाती संघटना

नेतृत्व – अर्चना भोयर, सदाशिव गजभिये, सोनू गोस्वामी.

मागण्या – सदाशिव गंगाराम गजभिये या दलित तरुणाच्या परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्यात यावी, गजभिये यांना १५ लाख रुपये आर्थिक मदत मिळावी, अश्विन हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टतंर्गत गुन्हा दाखल करावा, अश्विन हत्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अंधश्रद्धा पसरवून हत्या करण्यास कारणीभूत असलेल्या ढोंगी साधूबाबा तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करावी.