लोकसत्ता टीम

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात संगणक टंकलेखन परीक्षा घोटाळा उघडकीस आला आहे. पुणे स्थित महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सतर्कतेमुळे या घोटाळ्याचा भांडाफोड झाला असून ८ परीक्षार्थी परीक्षा केंद्राऐवजी ‘ बाहेरून’ टंकलेखन परीक्षा देत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी परिषदेच्या आदेशावरून शिक्षण विभागाने पोलिसात तक्रार दिली आहे.

चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात टँकलेखन परीक्षेचे केंद्र आहे. या केंद्रात माहिती तंत्रज्ञान शिक्षक आयटी टीचर) आणि परीक्षार्थी यांच्या संगनमताने हा ऑन लाईन परीक्षा घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले.

आणखी वाचा-अमरावती : ८६४ रुपयांच्या कापूस बियाणे पाकिटाची १८०० ला विक्री, कृषी विभागाची कारवाई

बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात १० जून ते १४जून या कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा घेण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या मुख्य मार्गदर्शन खाली ही परीक्षा घेण्यात येते. शिक्षण (माध्यमिक) विभागाच्या वरिष्ट सूत्रानुसार बुलढाणा जिल्ह्यात संगणक टॅंक लेखन परीक्षेचे सात परीक्षा केंद्र आहेत. काल गुरुवारी (दिनांक १३) परीक्षा घेण्यात येत आहे. चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी (इंजीनियरिंग) महाविद्यालयात याचे केंद्र आहे.

१३ जून रोजी सत्र क्रमांक ४०३ चा पेपर होता. अनुराधा अभियांत्रिकी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात बावीस विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते. पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष बावीस विद्यार्थ्यांनी ‘एक्सेस’ घेतल्याचं दिसून येत होतं. त्यावेळी पुणे येथीलराज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांशी ‘व्हिडिओ कॉल’ द्वारे संपर्क साधला.

आणखी वाचा-खासदार धानोरकर म्हणतात, “सहा विधानसभेच्या तिकीट मीच वाटणार”, पटोले म्हणतात पक्षात लोकशाही…

त्यांनी परीक्षा केंद्रातील विद्यार्थी ‘दाखवण्यास’ सांगितल्यावर मात्र केंद्र प्रमुखांची बोबडी वळली! याचे कारण त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते! त्यामुळे डॉक्टर बेडसे यांनी ‘इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत?’ असे दरडावून विचारलं असता केंद्रप्रमुख निरुत्तर झालेत. आता प्रत्यक्षात २२ विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं ‘ऑनलाइन एक्सेस’ दिसत होता. याचा अर्थ इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते. त्यात मजेदार बाब किंवा मेख म्हणजे संगणकीय टंकलेखन या परीक्षेचा ‘युजर आय डी’ व पासवर्ड हा फक्त आणि फक्त परीक्षा केंद्र प्रमुख यांच्याकडेच असतो. तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला ‘जॉईन’ कसे झाले.?

अनुराधा अभियांत्रिकी आणि केंद्र प्रमुख यांच्या दुर्दैवाने याच वेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल अकाळ हे या केंद्रावर भेट देण्यासाठी आले. डॉ बेडसे यांनी त्यांना तात्काळ पोलीस कारवाईचे तोंडी आणि पाठोपाठ लेखी आदेश देखील दिले आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे.

आणखी वाचा-पुतळ्याआडून कोणाचे हितरक्षण ? नागपुरात प्रशासनाच्या भूमिकेवर शंका

राज्यातही घोटाळ्याची शक्यता

चिखलीच्या अनुराधा अभियांत्रिकी सारखा घोटाळा बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच सात केंद्रावरही सुरु आहे किंवा झाला की याचीही चौकशी होणे काळाची गरज आहे. जरी हा घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे, अशीच ऑनलाईन घोटाळ्यासारखी स्थिती आहे का, याची चौकशी करण्याचीही गरज आहे. याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा राज्यव्यापी असण्याची शक्यता नाकारता येत नाही .