नागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडळातील कायम वीजपुरवठा खंडित असलेल्या ६८८ ग्राहकांनी विलासराव देशमुख अभय योजनेचा लाभ घेत ३.०३ कोटींपैकी १.८८ कोटींचा भरणा केला आहे. त्यामुळे या ग्राहकांना १.१५ कोटी रुपयांची सवलत मिळाली. नागपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या नागपूर व वर्धा जिल्ह्यातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांची संख्या १ लाख ५ हजार ५३१ असून त्यांच्याकडील एकूण थकबाकी १६८ कोटी आहे. त्यात १३६ कोटी मूळ थकबाकीचा समावेश आहे. विलासराव देशमुख अभय योजनेचा कालावधी १ मार्च २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ही योजना गैरकृषी ग्राहकांसाठी आहे. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहक योजनेचा लाभ घेऊ शकतात. ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ केला जातो. मुद्दलाची रक्कम एकरकमी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के तर लघुदाब ग्राहकांना १० टक्के सवलत मिळणार आहे.
योजनेच्या माध्यमातून थकबाकी रक्कम सुलभ हप्तय़ाने भरण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरायची आहे. उर्वरित रक्कम ६ हप्तय़ात भरण्याची सुविधा आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करावी, असे महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी कळविले आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकाने शेजाऱ्याकडून वीज घेतल्यास वीज घेणारा व देणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशाराही महावितरणकडून देण्यात आला आहे.