|| महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन कार्यालयांची वेगवेगळी आकडेवारी 

नागपूर : गेल्या तीन वर्षांची आकडेवारी बघता राज्यात सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण व मृत्यू २०२१ मध्ये झाले. परंतु आरोग्य विभागाच्या पुण्यातील राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सहसंचालक आरोग्य सेवा आणि आरोग्य सेवा संचालनालय, पुणे कार्यालयाने माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीमध्ये वेगवेगळी रुग्णसंख्या दर्शवलेली दिसत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येबाबत आरोग्य विभागच गोंधळलेला दिसत आहे.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सहसंचालक आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग, पुणे) कार्यालयाने सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना १ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये राज्यात डेंग्यूचे १४ हजार ८८८ रुग्ण आढळले. यापैकी ४९ रुग्ण दगावले. ही संख्या २०२० मध्ये  ३ हजार ३५६ रुग्ण होती. यापैकी १० रुग्ण दगावले.  २०२१ मध्ये १२ हजार ७२१ रुग्ण आढळले, यापैकी ४० रुग्ण दगावले. या कागदपत्रांवर जन माहिती अधिकारी म्हणून डॉ. महेंद्र जगताप यांची स्वाक्षरी आहे.

दरम्यान, कोलारकर यांना २ फेब्रुवारी २०२२ रोजी शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालय, पुणे कार्यालयाकडून दुसºयांदा माहिती मिळाली. त्यात २०१९ मध्ये राज्यात डेंग्यूचे २ हजार ६४ रुग्ण आढळले, पैकी ३ रुग्ण दगावले. २०२० मध्ये ३ हजार ३५६ रुग्ण आढळले, पैकी १० रुग्ण दगावले.

२०२१ मध्ये १२ हजार १८६ रुग्ण आढळले, पैकी ३२ रुग्ण दगावले. या कागदपत्रांवर वैद्यकीय अधिकारी तथा जन माहिती अधिकारी म्हणून डॉ. प्रदीप आवटे यांची स्वाक्षरी आहे. दोन्ही कार्यालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये रुग्ण व मृत्यूसंख्या समान असली तरी २०१९ आणि २०२१ मध्ये मात्र रुग्ण व मृत्यूसंख्या वेगवेगळी आहे. त्यामुळे दोन्ही कार्यालयांपैकी खरी आकडेवारी कुणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या विषयावर आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील आणि कीटकजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

हिवताप, चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येबाबतही घोळ

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सहसंचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयानुसार राज्यात २०१९ मध्ये हिवतापाचे ८,८६६ रुग्ण आढळले, पैकी ७ रुग्ण दगावले. २०२० मध्ये १२,९०९ रुग्ण आढळले, पैकी १२ रुग्ण दगावले. २०२१ मध्ये १९,२९६ रुग्ण आढळले, पैकी ८ रुग्ण दगावले.  चिकनगुणीयाचे २०१९ मध्ये १,६४६ रुग्ण, २०२० मध्ये ७८२ रुग्ण, २०२१ मध्ये २,४७९ रुग्ण आढळले. आरोग्य सेवा संचालनालय, पुणे कार्यालयाच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये हिवतापाचे ४,०४७ रुग्ण आढळले, पैकी १ दगावला. २०२० मध्ये १२,९०९ रुग्ण आढळले, पैकी १२ दगावले. २०२१ मध्ये ९,४३० रुग्ण आढळले, पैकी १२ दगावले. तर चिकनगुनियाचे २०१९ मध्ये २९७ रुग्ण, २०२० मध्ये ७८२ रुग्ण, २०२१ मध्ये २,४७९ रुग्ण आढळले. त्यामुळे दोन्ही कार्यालयांची हिवतापाबाबत २०२० मधील आकडेवारी सारखी असली तरी इतर दोन वर्षांच्या आकडेवारीत तफावत आहे.  चिकनगुनियाबाबत २०२० आणि २०२१ रोजीची आकडेवारी सारखी असली तरी २०१९ ची आकडेवारी वेगवेगळी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion health department number dengue patients different statistics two offices akp
First published on: 12-02-2022 at 09:53 IST