ओळखपत्रांत परीक्षा ठिकाणांविषयी अपुरी माहिती; एकास चक्क उत्तर प्रदेशातील महाविद्यालय

देवेश गोंडाणे, लोकसत्ता 

नागपूर : आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांसाठी शनिवार-रविवारी (२५ आणि २६ सप्टेंबर) लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांना मिळालेल्या परीक्षेच्या ओळखपत्राने गोंधळ उडवला आहे.

एका विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर चक्क उत्तर प्रदेश, नोएडाचे परीक्षा केंद्र नमूद आहे तर काहींच्या ओळखपत्रावर फक्त  महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांने कुठल्या जिल्ह्य़ाात परीक्षा द्यावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी या परीक्षेसंदर्भात आढावा बैठक घेऊन परीक्षा नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने होणार असल्याची ग्वाही दिली होती.

विद्यार्थ्यांच्या हातात ओळखपत्र पडताच गोंधळ उघड झाला आहे. आरोग्य विभागाच्या गट-क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबरला तर गट-ड संवर्गातील पदासाठी २६ सप्टेंबरला लेखी परीक्षा आहे. यातील गट- क संवर्गातील २७३९ आणि गट- ड संवर्गातील ३४६६ अशा एकूण ६२०५ पदांचा समावेश आहे. राज्यातील १५०० केंद्रांवर एकाच वेळी ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य़ स्रोतांमार्फत केली जाणार आहे. मात्र, या बाह्य़कंपनीने ओळखपत्र पाठवताना गोंधळ घातला आहे. ओळखपत्रांमध्ये चुकीची माहिती आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा कुठे द्यावी, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिवाय परीक्षेच्या दोन दिवसांआधीच हा प्रकार घडल्याने परीक्षेच्या नियोजनावर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी संपर्क साधला असता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिसाद दिला नाही.

गोंधळ काय? सांगली येथील एका विद्यार्थ्यांने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ओळखपत्रावर केवळ परीक्षा केंद्राच्या महाविद्यालयाचे नाव आहे. मात्र, गाव, जिल्हा काहीही दिलेले नाही. दुसऱ्या एका विद्यार्थ्यांला चक्क नोयडा, उत्तर प्रदेश येथील परीक्षा केंद्राचा पत्ता देण्यात आला आहे. याशिवाय अनेक विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लिंगबदल केला आहे. काही विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर वडिलांचे नावच नाही.  काहींच्या नावाच्या ठिकाणी वडिलांचे नाव छापून आले आहे.