नागपूर : शहरातील सर्वात गजबलेलेल्या चिटणीस पार्क चौकातील गर्दीत न्यू इंग्लिश माध्यमिक शाळा अडकली आहे. शाळा सुटताच विद्यार्थी, विद्यार्थिनी सायकलने थेट गर्दीच्या मुख्य रस्त्यावरून घराची वाट काढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

१३८ वर्षे जुनी शैक्षणिक संस्था असलेली न्यू इंग्लिश प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय हे चिटणीस पार्क-घाटे चौकात आहे. या शाळेत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची उपस्थिती होती. तसेच दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी शाळेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवाचे उद्घाटन केले होते. त्यावरून या शाळेचे महत्त्व लक्षात यावे. मात्र, याच शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना सुरक्षित असे वातावरण नाही.

आणखी वाचा-सावधान! ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवण्याचा बेत? आधी ही बातमी वाचा

शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ५ फुटावर मुख्य वाहता रस्ता आहे. शाळा सुटली की संपूर्ण रस्ता विद्यार्थ्यांनी व्यापला जातो. तेथे एकच गर्दी होते. पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. शाळेसमोरील पदपथ लहान दुकानदारांनी गिळंकृत केले आहेत. गांधीबाग सहकारी बँक आणि विवेकानंद सहकारी बँकांच्या मधोमध असलेल्या या शाळेला रुंद प्रवेशद्वार नाही. त्यामुळे आकाराने लहान प्रवेशद्वारातून विद्यार्थी एकाच वेळी बाहेर पडतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर गर्दी होते. दररोज अर्धा तास वाहतूक खोळंबते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर मानली जाते.

बाजारपेठामुळे रस्त्यावर गर्दी

घाटे चौकातून बडकस चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच दुकानांची मोठी गर्दी आहे. महालकडे जाण्यासाठी घाटे चौकातूनच जाणाऱ्या मार्गाचा वापर अधिक केला जातो. तसेच वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने जुनी वाहने खरेदी-विक्रीची दुकाने पदपथावर थाटण्यात आली आहेत. चिटणीस पार्क मैदान शाळेसमोरच असल्यामुळे क्रीडापटूंची गर्दीसुद्धा नेहमी असते.

आणखी वाचा-नागपूर : महात्मा फुले योजनेचा लाभ केवळ ४३ टक्के रुग्णांनाच! कारणे व लाभ जाणून घ्या…

शाळेला अतिक्रमणाचा विळखा

शाळेच्या आजूबाजूला दुकानदारांनी ठाण मांडले आहे. शाळेसमोरच ऑटो, कार आणि दुचाकींच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात. पाणीपुरीचे हातठेले आणि हार-फुले विक्रेत्यांनी रस्ता व्यापला आहे. बाजारपेठांमध्ये पायी जाणाऱ्यांसाठीसुद्धा रस्ता मोकळा नाही. वाहतूक पोलीस आणि महापालिका कर्मचारी या परिसरात कारवाई करीत नाहीत.

वाहतूक पोलीस हवे

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा भरताना आणि सुटण्याच्या वेळी वाहतूक पोलीस तैनात करा. अनुचित घटना घडल्यावर कारवाई करून काही उपयोग नाही. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. -कैलास कुरुडकर (वाहन चालक)

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस उपाययोजना करीत आहेत.” -माधुरी बाविस्कर, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा.

Story img Loader