नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यघटना आणि लोकशाही धोक्यात आली आहे. देश जात-धर्म यात दुभंगला आहे. भारताची अखंडता व एकता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसतर्फे ७ सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा काढण्यात येणार असून १५० दिवसांच्या पदयात्रेतील १६ दिवस ही पदयात्रा महाराष्ट्रात फिरणार आहे.

हेही वाचा >>> अमरावती : आमदार रवी राणा यांच्या शेतातील गोदामात चोरी ; ५ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास

काँग्रेस नेत्या व हरयाणातील आमदार गीता भुक्कल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आमदार विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, दिनेश बानाबाकोडे, मनोज सांगोळे उपस्थित होते.केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करताना भुक्कल म्हणाल्या, देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. बेरोजगारांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. समाजा-समाजात तणाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा विरोधी पक्षाच्या नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी वापर केला जात आहे. मोदींच्या चुकीच्या धोरणामुळे देशात आर्थिक विषमतेची दरी वाढत आहे.

हेही वाचा >>> नागपूर रेल्वेस्थानकावरही आधार अपडेट केंद्र

समाजात धर्म आणि जात यावरून भेदभाव निर्माण केला जात आहे आणि विरोधी पक्षाचे सरकार अस्थिर केले जात आहे. या विरोधात काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी भारत जोडो यात्रेची घोषणा केली आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून उत्तरेकडे काश्मीरपर्यंत १५० दिवसात एकूण ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत एकूण १२ राज्यांचा आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. पदयात्रेत काँग्रेसचे ११८ नेते अखेरच्या टप्प्यापर्यंत यात्रेसोबत राहतील. यामध्ये ३१ महिला नेत्यांचा समावेश असेल. तर संबंधित राज्यातील नेते, कार्यकर्ते त्या-त्यावेळी यात्रेशी जुळतील. काँग्रेसशिवाय समविचार पक्ष, संघटना देखील यात सहभाग घेणार आहेत. आतापर्यंत ४० हजार नागरिकांनी यात्रेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती आमदार भुक्कल यांनी दिली.