नागपूर : आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने तीन उमेदवार जाहीर केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांना पुन्हा संधी, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी अदिती पोहरे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा तीन मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली. नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार वंजारी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून पोहरे, तर पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत आजगावकर यांना काँग्रेसने रिंगणात उतरवले.
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील लढतीकडे विशेष लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत अॅड. वंजारी यांनी भाजपचे संदीप जोशी यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आणला होता. भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात वंजारी यांनी विजय मिळवत राजकीय समीकरणे बदलली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर प्रा. अनिल सोले यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले. दीर्घकाळ भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ मागील निवडणुकीत काँग्रेसने खेचून आणला. त्यामुळे वंजारी यांना पुन्हा उमेदवारी देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातून प्रा. पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पोहरे यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर त्यांना उमेदवारी मिळाल्याने अमरावतीतील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातून आजगावकर यांना उमेदवारी देण्यात आली.
दरम्यान, काँग्रेसने तीनही मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर केले असताना भाजपकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. भाजपकडून कोणाला संधी दिली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
