काही दिवसांपासून रोज येणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अशाच एका ठिकाणी काही नागपूरकरांनी बोट चालवण्याचा आनंद लुटला. काहींनी या मुद्यावरून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकाही केली.

उपराजधानीत मागील पाच-सहा दिवसांपासून दररोज जोरदार पाऊस कोसळत आहे. रविवारी देखील मुसळधार पाऊस झाला. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले. पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्यावरच तुंबून राहिले. अशाचप्रकारे अमरावती मार्गावर मारुती सेवा शोरूमजवळ पाणी साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले. त्यात काही हौशी नागपूरकरांनी बोट चालण्याचा आनंद लुटला. त्याची चित्रफीत तयार करून समाजमाध्यमावर प्रसारित केली. ही चित्रफीत काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय समर्थ यांनी त्यांच्या फेसबुकवर प्रसारित केली. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला.

गडकरी यांनी नागपूरची नागनदी स्वच्छ करून त्यातून बोटद्वारे प्रवास करता येईल, असे म्हटले होते. आता पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्त्यांनाच नदीची स्वरूप आले. त्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी टीका समर्थ यांनी केली.