देशात, राज्यात, स्थानिक स्वराज्य संस्थांत कुठेच काँग्रेस शिल्लक नाही, अशी टीका करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला महापालिकेतील सत्ता केवळ पदे भोगण्याकरिता नाही तर शहर विकासासाठी हवी आहे, असे प्रतिपादन केले. चंद्रपूरला राज्यातील ‘मॉडेल’ शहर म्हणून विकसित करण्याचा तसेच ‘वायफाय’ सुविधा देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

चांदा क्लक ग्राऊंडवर आयोजित प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. याावेळी मंचावर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार रामदास तडस, आमदार नाना शामकुळे, अ‍ॅड.संजय धोटे, बंटी भांगडीया, महापौर राखी कंचर्लावार उपस्थित होते.

आज मोठय़ा प्रमाणात राज्याचे नागरीकरण झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्मार्ट सिटी’ व ‘अटल अमृत योजना’ आणली आहे. यासोबतच स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आम्ही २८ शहरात एकाच वेळी १६०० कोटींच्या ‘अमृत योजने’चे भूमिपूजन केले. येत्या काळातही मोठय़ा प्रमाणात विकास कामे करून शहराचा चेहरा मोहरा बदलविण्याचे प्रयत्न आहे. राज्यात सर्वत्र भाजपची सत्ता आहे. काँग्रेस कुठेच शिल्लक नाही. चंद्रपूर महापालिकेतही दोन तृतीयांश बहुमत भाजपला मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

वैद्यकीय महाविद्यालय, वनस्पती उद्यान, वन अकादमी, इरई नदी प्रकल्प तसेच सिमेंट रस्ते, अटल अमृत योजना अशा स्वरूपाची एकूण २६०० कोटीची विकास कामे या जिल्हय़ात सुरू असल्याची माहिती, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, आमदार नाना शामकुळे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद कडू यांनी केले. सभेला चांगली गर्दी होती.

शामकुळेंची माध्यमांवर टीका

या देशातील प्रसार माध्यमे भाजप विरोधी लिखाण करीत असल्याची टीका आमदार नाना शामकुळे यांनी केली. केंद्रात, राज्यात तसेच स्थानिक पातळीवर भाजपच्यावतीने जाती व धर्माच्या आधारावर नाही तर केवळ विकास कामांच्या बळावर सत्ता मिळविली आहे. मात्र तरीही देशातील प्रसार माध्यमे भाजपला लक्ष्य करीत आहेत, असे ते म्हणाले.