चंद्रपूर : राजुरा नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी अखेर काॅग्रेस व शेतकरी संघटना युतीची रितसर घोषणा आज मंगळवारी (११ नोव्हेंबर) राजुरा येथील छत्रपती शिवाजी संकुल येथे झालेल्या सभेत करण्यात आली. यामुळे या बहुप्रतीक्षित युतीला अखेर नेते व कार्यकर्त्यांनी मान्यता दिली असून संपुर्ण निवडणूक एकदिलाने निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी काॅग्रेस १२ आणि शेतकरी संघटना ९ जागांवर लढणार असून काॅग्रेसचे अरुण धोटे नगराध्यक्ष उमेदवार राहणार अशी घोषित करण्यात आली. यावेळी भरगच्च उपस्थिती असलेल्या सभागृहात जोरदार टाळ्यांच्या गजरात या युतीचे स्वागत करण्यात आले.

या सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप होते. प्रमुख पाहुणे माजी आमदार सुभाष धोटे, निळकंठराव कोरांगे, महिला काॅग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड.कुंदा जेनेकर, अरूण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, ॲड.दिपक चटप, सुनिल देशपांडे, सुरज ठाकरे, सिध्दार्थ पथाडे, रमेश नळे, दिलीप देठे, हरजितसिंग संधू, नरेंद्र काकडे आदी काॅग्रेस व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ॲड. वामनराव चटप म्हणाले, सन २००१ मध्ये नगर विकास आघाडी निर्माण करून त्यात विरोधी पक्षाला एकाही जागी विजय मिळविता आली नाही. देशात व राज्यात शेतक-यांप्रती व नागरिकांबाबत भाजपची अन्यायकारक भूमिका आणि राजुरा शहरातील लोकांना न्याय मिळावा म्हणून अखेर युतीचा निर्णय घेण्यात आला. काॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी व्होटचोरीचा मुद्दा अधोरेखीत करीत नगर पालिकेच्या निवडणूकीच्या माध्यमातून भाजपला धडा शिकविण्याचे आवाहन केले.

यावेळी निळकंठराव कोरांगे, ॲड. दिपक चटप, सिध्दार्थ पथाडे व अरूण धोटे यांची भाषणे झाली. या सभेत सर्व उमेदवारांचा परिचय करून देण्यात आला. या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या काही इच्छूकांना उमेदवारी देता आली नसली तरी सर्वांनी मिळून मिसळून कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने काॅग्रेस व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.