नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबतची टिप्पणी हीच भाजपची मानसिकता आहे. या पक्षाला केवळ विलासराव देशमुख यांचीच नाहीतर त्यांच्या पक्षातील दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह लालकृष्ण अडवाणी आणि नितीन गडकरी यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत. एवढेच नाही तर पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आाणि गोळवलकर गुरुजी यांचे विचारदेखील संपवण्याचा मनसुबा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात त्यांनी सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड भाष्य केले. यापुढे ज्या काही आठवणी राहणार त्या केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याच राहायला हव्यात असा प्रकार सुरू आहे. रेशीमबागमध्येही डॉ. हेडगेवारांच्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि त्यांचे पट्टशिष्य म्हणून गोळवलकरांच्या ठिकाणी अमित शहा यांचा पुतळा बसवायचा आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हनुमानाच्या भूमिकेत राहून मदत करत असल्याचा दावा त्यांनी केला.

यासाठी पंकजा मुंडे यांचे राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न झाला. पुढे धनंजय मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना मंत्रिमंडळातून दूर केले. त्यामुळे या सर्वांना बाजूला करणे हीच भाजपची मानसिकता असल्याचे सपकाळ म्हणाले. या निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पण नाहीत याची आठवण सपकाळ करून देत भाजपला लक्ष्य केले.

‘राइट टू रिकॉल’साठी जनआंदोलनाची गरज

यापूर्वी होणाऱ्या बिनविरोध निवडणुकांना विचारांचे अधिष्ठान होते. परंतु, हल्ली बिनविरोध निवडून येणे हा नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराचे हनन ठरत आहे. सत्ता आणि पैशाचा वापर करून विरोधातील उमेदवारांवर दबाव आणला जात आहे. राक्षस बनून सर्वांना गिळंकृत केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या हक्काचे रक्षण होण्यासाठी पुन्हा एकदा जनतेनेच ‘राइट टू रिकॉल’साठी आंदोलन उभे करणे आवश्यक असल्याचे सपकाळ म्हणाले.