तीन सदस्यीय प्रभागाच्या निर्णयामुळे महापालिकेतील चित्र बदलणार

नागपूर : महापालिका निवडणुकीतील बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द करून एकसदस्यीय वॉर्डप्रमाणे निवडणूक घेण्याच्या शासनाच्या यापूर्वीच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याची काँग्रेसची अपेक्षा बळावली होती. परंतु, राज्य शासनाच्या बुधवारच्या बैठकीत पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग (तीन सदस्य प्रभाग) पद्धतीने निवडणूक घेण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळेच मागील पंधरा वर्षांपासून महापालिके त सत्तेत असलेल्या भाजपसाठी हा निर्णय पथ्यावर पडणारा ठरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महापालिके च्या निवडणुकीची मोर्चेबांधणी एक वर्षांपासून सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी सुरू के ली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पंधरा वर्षांपासून महापालिके त सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने कंबर कसली होती.

या प्रयत्नातूनच बहुसदस्यीय प्रभाग रद्द करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली होती. कारण या पद्धतीचा फायदा भाजपला होत असल्याचे यापूर्वीच्या तीन निवडणुकांच्या निकालातून दिसून आले होते. त्यामुळे ही पद्धत बाद करीत एक सदस्यीय वॉर्ड प्रणालीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. २५ ऑगस्टला राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला वार्ड फेररचनेचा आराखडाही तयार करण्यास सांगितले होते.

त्यामुळे काँग्रेसचा उत्साह वाढलेला होता. एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असा अंदाज राजकीय पंडित वर्तवत होते. मात्र बुधवारी २२ सप्टेंबरला मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन पुन्हा बहुसदस्यीय म्हणजे तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेसचा हिरमोड झाला आहे.

दुसरीकडे संघटनात्मक पाठबळाच्या जोरावर बहुसदस्यीय प्रणालीत भाजप वरचढ ठरत आल्याने या निर्णयाचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे.

फेररचनेला ‘ब्रेक’, इच्छुकांनाही धक्का

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, महापालिका प्रशासनाने एकसदस्यीय वॉर्डरचनेच्या कामाला सुरुवात के ली होती. आता तीन सदस्यीय प्रभाग झाल्याने पुन्हा नव्याने या कामाला सुरुवात करावी लागणार आहे. या प्रणालीमुळे सदस्य संख्या वाढणार की जुनीच कायम राहणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, एक सदस्यीय वॉर्ड होणार म्हणून अनेक इच्छुकांनी त्यांच्या भागात मोर्चेबांधणीला सुरुवात के ली होती, त्यांच्या प्रयत्नांनाही या निर्णयामुळे धक्का  लागला आहे.

सद्यस्थिती

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. सध्या चार सदस्यीय प्रभाग पद्धत अस्त्विात आहे. एकूण प्रभागांची संख्या ३८ आहे. त्यातून १५१ सदस्य निवडून आले. त्यात भाजपचे १०८  सदस्य आहेत.

महापालिकेतील पक्षीय बळ

  •    एकू ण सदस्य – १५१
  •    भाजप – १०८
  •    काँग्रेस – २९
  •    बसपा – १०
  •    इतर – ०४

पुन्हा जैसे थे व्यवस्था

सध्या चार सदस्यीय प्रभाग आहे. आता तीन सदस्यांचा असेल एवढाच काय तो नवा बदल आहे.  चार सदस्यीय प्रभागाचा आकार  जवळजवळ विधानसभा मतदारसंघाइतका असल्याने आपला नगरसेवक कोण हे मतदारांनाच कळत नव्हते. एक सदस्यीय प्रभागामुळे ही समस्या मिटणार होती. आता तीन सदस्यीय प्रभागामुळे पुन्हा जैसे थे व्यवस्था झाली आहे.

वॉर्ड ते प्रभाग रचनेचा प्रवास

२००२ च्या महापालिका निवडणुकीत तीन सदस्यीय प्रभाग होता. २००७ मध्ये पुन्हा एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाली. २०१२ मध्ये पुन्हा प्रभाग झाले. २०१७ मध्ये हीच पद्धत कायम राहिली. या दोन्ही निवडणुका भाजपने जिंकल्या होत्या. २०१७ मध्ये तीन ऐवजी चार सदस्यांचा प्रभाग झाला होता. या निवडणुकीतही भाजपला घवघवीत यश मिळाले. २०२२ मध्ये पुन्हा तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका होणार आहेत.

‘‘एक सदस्यीय असो की चार सदस्यीय. पंधरा वर्षांत केलेल्या कामांमुळे भाजपला भय नाही. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे आम्हाला फायदा होईल. ’’

आ. प्रवीण दटके, शहराध्यक्ष, भाजप.

तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय चांगला आहे. २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग  पद्धती असताना काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य निवडून आले होते. त्याची पुनरावृत्ती होईल. काँग्रेसने बुथपातळीवर काम सुरू केले आहे, त्यामुळे प्रभाग पद्धतीचा पक्षाला फायदाच होईल.’’

आ. विकास ठाकरे, शहराध्यक्ष, काँग्रेस.