गडचिरोली : राजकीय वरदहस्ताच्या जोरावर नियमांना केराची टोपली दाखवून उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांविरुद्ध अहेरी नगरपंचायतीने अखेर ‘हतोडा’ चालवला आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांच्या मालकीची अनधिकृत इमारत मंगळवारी प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली. न्यायालयीन लढाईत कोणताही दिलासा न मिळाल्याने अखेर प्रशासकीय यंत्रणेने ही धडक कारवाई केली.
अहेरी-गडअहेरी मार्गावर कंकडालवार यांनी भूखंड खरेदी करून इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, राज्य महामार्गापासून पाळावयाचे अंतर आणि रस्त्याच्या हद्दीपासून सोडायची ४.५० मीटरची जागा, या नियमांचे सरळ उल्लंघन करण्यात आले होते. नगरपंचायतीने या बांधकामाचा नकाशा सुरुवातीलाच नाकारला होता, मात्र प्रशासकीय सूचनांकडे दुर्लक्ष करून हे बांधकाम रेटून नेण्याचा प्रयत्न झाला. वारंवार नोटीस देऊन आणि पोलीस तक्रार करूनही बांधकाम न थांबवल्याने हे प्रकरण कायदेशीर पेचात अडकले होते.
या प्रकरणाला स्थानिक राजकारणाचीही मोठी किनार आहे. विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणे आणि कंकडालवार यांची बंडखोरी यामुळे हे प्रकरण अधिक तापले होते. विरोधकांनी या अनधिकृत बांधकामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर २९ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने कंकडालवार यांच्या विरोधात निकाल दिला. वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी दिलेली मुदत संपताच, कोणतीही स्थगिती नसल्याचे स्पष्ट होताच नगरपंचायतीने कारवाईचे पाऊल उचलले.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी अहेरी पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता. सकाळपासूनच बुलडोझरने इमारतीचे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. राजकीय दबावा झुगारून प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही बांधकामाला थारा दिला जाणार नाही, असा कडक इशारा या कारवाईद्वारे प्रशासनाने दिला आहे.

