ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

नागपूर : द्वेषमूलक भाषणे करून समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा प्रबोधनकार ठाकरे यांना स्मरण करून लोकांना भेडसावणारे प्रश्न सोडवा, असा सल्ला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता दिला.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉप्युलेशन पॉलिसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी पार पडले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्यप्रणालीद्वारे मुंबईवरून उपस्थित होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठाचे प्रो.डॉ. केविन डी. ब्राऊन, अनुसूचित जाती आयोगाचे समन्वयक के. राजू व तामिळनाडूचे आमदार सिलिव्हम उपस्थित होते.

खरगे पुढे म्हणाले, जात ही राष्ट्रद्रोही आहे कारण ती समाजात विभागणी करते, असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. परंतु आज समाजासमाजात तेढ निर्माण करणे, एकमेकांचा द्वेष करणे, द्वेषमूलक भाषणे सुरू आहेत. त्याला कोणाचेही निर्बंध नाहीत. दिवंगत प्रबोधनकार ठाकरे यांच्या कुटुंबातील काही लोक अशाप्रकारची भाषा वापरत आहेत. लोकांमध्ये भांडणे लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी प्रबोधनकारांचे स्मरण करून धर्म, जातीमध्ये वाद निर्माण न करता वर्तमानात लोकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवाव्या, असे आवाहन खरगे यांनी केले.

अलीकडे ‘हम दो हमारे दो’ या घोषणेचा वेगळा अर्थ काढला जात आहे, असे सांगतानाच, खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि अंबानी-अदानी यांच्यातील आर्थिक हितसंबंधांबाबत टीका केली. ते म्हणाले, या लोकांनी गरिबांसाठी काहीच सोडले नाही. महागाई वाढली आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. केवळ धर्माच्या नावावर वातावरण बिघडवून लोकांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. काय खायचे, काय खाऊ नये, हे यांच्याकडून शिकायचे काय? समुद्र किनाऱ्यावरील भागात ९९.९९ टक्के ब्राह्मण मासे खातात. स्वामी विवेकानंदही मांसाहारी होते. त्यांच्या नावे हे लोक राजकारण करतात. स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वांचे आम्ही सर्वजण पालन करतो. परंतु जे लोक पालन करीत नाही, ते लोक केवळ समाजाला तोडू पाहत आहेत. अशा लोकांचा सध्या बोलबाला आहे, अशी परखड टीकाही त्यांनी भाजपवर केली.

समाजात विष पेरण्याचे काम नागपुरातून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म माणसामुळे आहे, धर्मामुळे माणूस नाही, असे मत मांडले होते. परंतु अलीकडे धर्माचा उन्माद होत आहे. समाजात विष पेरण्याचे काम नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून होत आहे, तर हे विष बाहेर काढण्याचे काम दीक्षाभूमीतून केले जात आहे, असेही खरगे यांनी सांगितले.

अंध भक्तांचा सुळसुळाट – मुख्यमंत्री ठाकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कायम उपाय सुचवतात. या पुस्तकात त्यांच्या लोकसंख्येसंदर्भातील विचारांची, धोरणांची माहिती दिली आहे. डॉ. नितीन राऊत हे बाबासाहेबांचे भक्त आहेत. त्यांचे विचार त्यांनी कधीच सोडले नाही. ते अंधभक्त नाहीत. परंतु अलीकडे अंध भक्तांचा सुळसुळाट वाढला आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना हाणला. सामान्यत: राजकारणातील व्यक्ती अभ्यास करून काही लिहितो, याबाबत शंका उपस्थित केली जाते. मात्र, डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर पुस्तक लिहून राजकारणीही अभ्यासू असतात, हे दाखवून दिले, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.