नागपूर: काँग्रेस पक्षाच्या राजस्थान येथील पर्यवेक्षिका संगिता बेनिवाल यांच्या वाहनाला  बुधवारी नागपूरजवळील खापा चौकात अपघात झाला. बेनिवाल तुमसर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आटोपून  नागपूरकडे जात होत्या. या वेळी त्यांच्या इनोव्हा कारला गोंदियाकडे जाणाऱ्या एका ब्रेझा कारने धडक दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काँग्रेस नेत्यांच्या वाहन अपघातांची मालिका चर्चेत आली आहे.

कुंदा राऊत यांसह सर्वजण सुरक्षित

अपघाताच्या वेळी कारमध्ये नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या कुंदा राऊत  होत्या. सुदैवाने त्या तसेच इतर सर्वजण सुरक्षित आहेत. अपघातानंतर पक्षातील अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्या सुरक्षिततेची खात्री केली.

डॉ. पडोळे यांच्या अपघातानंतर दुसरी घटना

काँग्रेस नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याची मालिका सुरू  आहे. तीन दिवसांपूर्वीच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे  कॉंग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाहनालाही अपघात झाला होता.ते भंडाऱ्याहून दिल्लीकडे जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने धडक दिली होती. त्या अपघातात ते थोडक्यात बचावले होते. हा त्यांचा तिसरा अपघात होता,

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष? 

स्थानिक पोलिसांनी अपघातानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक तपासात ब्रेझा कारचालकाने वाहतुकीचे नियम पाळले नसावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अपघाताचा पंचनामा  करण्यात आला असून, संबंधित चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. खापा चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील भाग मानला जातो. येथे मोठी वर्दळ असल्याने पोलिसांनी विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेस पक्षासाठी सलग अपघातांच्या घटना चिंतेचा विषय ठरत आहेत. पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते बेनिवाल यांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत असून, पुढील कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यावर भर देण्यात येत आहे.