चंद्रपूर : महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत राज्यात कुठेही झाला नाही असा भाजप शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाच्या युतीचा प्रयोग चंद्रपुरात झाला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना काँग्रेस पक्षाला सोडून भाजप सोबत संसार थाटणार नाही अशीच सर्वत्र चर्चा असतांना काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभा, नगर पालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळेच स्थानिक पातळीवर ही युती झाली. ही युती व्हावी यासाठी भाजप नेते माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांनी तसे प्रयत्न केले तसे खासदार धानोरकर यांच्याकडून होतांना कधीच दिसले नाही.

एकूण ६६ सदस्य संख्या असलेल्या चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २७ नगरसेवक आहे. त्या पाठोपाठ भाजप २३, शिवसेन ठाकरे ६, शेतकरी कामगार पक्ष ३, वंचित व अपक्ष प्रत्येकी दोन तर शिंदे सेना, एमआयएम, बसप प्रत्येकी एक नगरसेवक आहे. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे ६ , वंचित २ आणि दोन अपक्ष या दहा नगरसेवकांनी एकत्र येत मोट बांधली. त्यामुळे या दहा नगरसेवकांकडे सत्तेची चाबी होती. मात्र ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी पहिल्या दिवसापासून महापौर पद देणाऱ्या पक्षासोबत युती करणार अशी ठाम भूमिका घेतली होती.

परंतु गिऱ्हे यांना महापौर पद देण्यास काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला. मंगळवारी गिऱ्हे यांची काँग्रेस निरीक्षक सुनील केदार, आमदार विजय वडेट्टीवार तसेच भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा झाली. काँग्रेसने महापौर पदाचे सर्वाधिकार खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे सोपविले होते. धानोरकर या महापौर पद शिवसेनेला सोडण्यास तयार नव्हत्या.

काँग्रेस सोबतची बोलणी फिस्कटल्यनंतर भाजपचे मुनगंटीवार यांच्याशी झालेल्या चर्चेत सव्वा सव्वा वर्ष महापौर पद विभागून घेणे, तसेच शिवसेनेला दोन वर्षा स्थायी समिती सभापती आणि उपमहापौर पद देण्याची तयारी भाजपने दाखविली. भाजप व ठाकरे सेना एकत्र येत असल्याची माहिती आमदार वडेट्टीवार यांना मिळताच पून्हा गिऱ्हे यांना चंद्रपुरातील निवासस्थानी बोलवून चर्चा केली. गिऱ्हे यांच्या पत्नीचा काँग्रेस प्रवेश करून तिला महापौर पद देणे इथपर्यंत बोलणी झाली होती.

मात्र खासदार धानोरकर महापौर पदाचा हट्ट सोडायला तयार नसल्याने अखेरीस काँग्रेस सोबतची बोलणी तिथेच थांबली. वडेट्टीवार यांच्या घरातून बाहेर पडताच सेनेचे गिऱ्हे यांनी भाजप नेत्यांशी संपर्क साधला. त्यानंतर सव्वा सव्वा वर्षाचा महापौर पदाचा लेखी करार ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा यांनी केला. या करारावर भाजप व सेना या दोन्ही नेत्यांच्या स्वाक्षरी होताच भाजप व सेना ठाकरे एकत्र येत असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी केली.

भाजप व ठाकरे सेना एकत्र येत असल्याची घोषणा होताच महापालिकेत भाजप महापौर व उध्दव ठाकरे सेनेचा उपमहापौर बसणार हे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष जिवंत ठेवल्याचे तर खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार विजय वडेट्टीवार या दोन नेत्यांनी पक्षाला मृत्युच्या शय्येपर्यंत नेल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या संपूर्ण निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवाला खऱ्या अर्थाने खासदार प्रतिभा धानोरकर याच जबाबदार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख असो की अपक्ष नगरसेवक यांच्यासोबत संख्याबळाचे , सत्तेचे गणित जुळविण्यासाठी खासदार धानोरकर यांनी पुढाकार घेतल्याचे मागील २५ दिवसात दिसले नाही. संख्याबळाची जुळवाजुळव करण्याऐवजी धानोरकर व वडेट्टीवार यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत भांडत राहण्यातच वेळ घालविला. त्याचाच परिणाम आज महापालिकेत पून्हा एकदा भाजपची सत्ता आली. महापालिकेत भाजपची सत्ता बसविण्यात भाजप नेत्यांऐवजी काँग्रेस नेत्यांचेच श्रेय अधिक आहे.

दरम्यान काँग्रेस नेतेच भाजप शिवसेना ठाकरे युतीचे खरे शिल्पकार असल्याचीही चर्चा आहे. तसेच भारतीय कामगार पक्षाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी वेळोवेळी काँग्रेस नेत्यांना दिलेला इशारा, तसेच काही नगरसेवकांना सोबत घेवू नका, अन्यथा आम्हीच काँग्रेसची साथ सोडू अशी वारंवार दिलेली धमकी त्यामुळेही काँग्रेस पक्षाचे महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत मोठे नुकसान झाले आहे.