नागपूर : २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मत घोटाळा झाला आहे. त्यावर निवडणूक आयोग नेमके उत्तर देण्याचे टाळते आहे. सत्ताधारी भाजप त्यावर प्रतिवाद करून मुख्य विषय बाजूला सारण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरुद्ध मशाल मोर्चा काढण्यात येईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
सपकाळ यांच्याशी सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, सर्वोदयी कार्यकर्ते, चळवळीतील नेते यांच्यासोबत सर्वोदय आश्रम, नागपूर, येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी लोकशाही वाचवण्याची सर्वांचीच जबाबदारी असल्याचे सांगून लोकशाहीत सर्वांची भागीदारी असण्यावर भर दिला. ते म्हणाले, काँग्रेस म्हणून दोन प्रमुख बाबी प्रामुख्याने राबवण्यात येत आहे. सत्ता प्राप्ती हे जरी लक्ष्य असले तरी माझ्यासमोर विचारधारेची लढाई आहे. तसेच पक्ष संघटना बळकट करायची आहे. साडेतीन महिन्यात पदयात्रा काढून राज्यातील लयास गेलेली सद्भावना जागवण्याचा प्रयत्न करीत आहे.
यावेळी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी काँग्रेसने समग्र शेतकरी धोरण तयार करावे. ते सर्व राज्यासाठी सारखे असावे, अशी सूचना केली. या देशात सर्वाधिक असंघटित कामगार आहेत. पण, त्यांचा वाली कोणी राहिलेला नाही. देशभरात कामगारांना काँग्रेसच्या राजकीय भूमिकेशी जोडण्यासाठी काँग्रेसने या वर्गाला हात दिला पाहिजे, अशी भूमिका कामगार नेते विलास भोंगाडे यांनी मांडली.
दरम्यान, पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी मोदींच्या ११ वर्षांच्या काळाचे वर्णन ‘बोलायचा भात, बोलाची कढी’ असे केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांच्यावतीने मोदींच्या कामाचा लेखाजोखा मांडला पाहिजे. भारताचा हॅपी इंडेस्क कमी आहे, बेरोजगारांची आकडेवारी वाढत आहे, गरीब आणखी गरीब होत आहे, मोदींनी २०१४ मध्ये २ कोटी नोकरी देऊ, शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग लागू करू, स्मार्ट सिटी तयार करू, असे आश्वासन दिले होते. यापलीकडे जाऊन प्रत्येक भारतीयांच्या खात्यात १५ लाख टाकणार, पेट्रोलचे दर कमी करणार, असे मोदी म्हणाले होते. त्यातील किती आश्वासन पूर्ण केले याचा नागरिकांनीच विचार करावा, असे सपकाळ म्हणाले. तसेच अण्णा हजारे, रामदेव बाबा याचे आणि लोकपाल यांचे काय झाले याचेही उत्तर मोदींनी दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर आमचे नेते संघटितपणे निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
किरण कुलकर्णीची ‘नार्को टेस्ट’ करा
विधानसभा निवडणुकीत मतांवर डल्ला मारला, त्याचे सूत्रधार हे कुलकर्णी आहेत. संध्याकाळी सहानंतर ४१ लाख मतदान कसे वाढले हे ‘ओपन सिक्रेट’ आहे. तेथे कार्यरत किरण कुलकर्णी असल्यामुळे त्यांची नार्कोटेस्ट व्हावी. मतांवर दरोडा टाकलेला असून ही ‘मॅच फिक्सिंग’ आहे. मतांची चोरी पुढे स्पष्ट होणारच आहे. निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार अगोदर सुद्धा केली आहे. निवडणूक आयोग अमित शहा यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही सपकाळ म्हणाले.