नागपूर : नागपूर जिल्हा काँग्रेस प्रभारी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा काँग्रेसमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. जगताप यांनी सांगितले की, केदार मुंबईत असल्याने बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.
या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यापूर्वी ७ नोव्हेंबर रोजी सुनील केदार यांच्या गटाने जिल्हा निवड मंडळाच्या अनुपस्थितीत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मात्र, प्रदेश काँग्रेसने या कारवाईवर आक्षेप घेत ती प्रक्रिया अमान्य ठरवली आणि नव्याने मुलाखती घेण्याचे निर्देश दिले.
नागपूर जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि १२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून, १६ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांची नावे निश्चित करण्यात येतील, अशी माहिती वीरेंद्र जगताप यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तातडीने जिल्हा काँग्रेस ग्रामीणची बैठक बोलावून संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर गणेशपेठ येथील काँग्रेस कार्यालयात जिल्हा काँग्रेस ग्रामीणची बैठक झाली. या बैठकीस जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, सुनील केदार यांच्या अनुपस्थितीमुळे जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांवर चर्चा सुरू झाली आहे.
१२ नोव्हेंबरला जिल्हा प्रभारी, विधानसभा प्रभारी आणि निवड मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घ्यावी, आणि त्यानंतर १३ नोव्हेंबरला राज्य निवड मंडळासमोर माहिती सादर करावी, असे प्रदेश काँग्रेसने जिल्हा निवड समितीला सूचित केले होते. नागपूर जिल्ह्यातील २७ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी काँग्रेसने जिल्हा निवड समिती स्थापन केली आहे. यामध्ये वरिष्ठ नेते, आजी-माजी पदाधिकारी यांचा समावेश असून त्यांच्या उपस्थितीतच मुलाखती घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.
गेल्या आठवड्यात सुनील केदार यांच्या गटाने पक्षाच्या अधिकृत निरीक्षकांना न बोलावता मुलाखती घेतल्याने गटबाजीचे वृत्त समोर आले होते. यावरूनच प्रदेश काँग्रेसने हस्तक्षेप करत नव्या प्रक्रियेचा आदेश दिला. वीरेंद्र जगताप यांनी मात्र स्पष्ट केले की, जिल्हा काँग्रेस एकजूट आहे, मतभेद नाहीत. सर्व निर्णय पक्षाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घेतले जातील.
