अकोला : बिश्नोई टोळीकडून अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा एकदा धमकी आली. काँग्रेस नगरसेवकाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून धमकी देण्यात आली आहे. ‘अद्यापही वेळ गेली नाही. लवकर ‘सेटलमेंट’ करा, अन्यथा आता फोन नाही, तर डायरेक्ट गोळी येईल,’ अशी धमकी बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकर याने दिल्याचा आरोप होत आहे. हा मुद्दा आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ.विजय वडेट्टीवार आणि आ. नाना पटोले यांनी कठोर कारवाईची मागणी केली.

फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा धमकीचा फोन

बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना दुसऱ्यांदा धमकीचा फोन केला आहे. या अगोदर बिश्नोई टोळीतील हस्तक शुभम लोणकर याने आमदार पठाण यांच्याशी भ्रमणध्वनीवरून १७ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास हा संपर्क केला होता. ‘‘दोन दिवसांत १० कोटी रुपये दे, अन्यथा तुझा गेम करू, अशी धमकी शुभम लोणकर याने दिली. हा कॉल कॅलिफोर्नियावरून आल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. सशस्त्र पोलीस त्यांच्या सुरक्षेत तैनात केले आहेत.

अधिवेशनादरम्यान पुन्हा एकदा धमकी

आता धमकीचा फोन काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे यांना करण्यात आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला बिश्नोई गोळीतील शुभम असल्याचे सांगत, ‘‘साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही, तर २ जुलै रोजी दुपारी २ वाजता काय होते ते दाखवून देतो,’’ अशी धमकी दिली. या संभाषणाचे कथित ध्वनीफित समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

‘नाही तर मौत के लिए तयार हो जा’

‘‘साजिद खान यांना ही लास्ट वॉर्निंग आहे. त्यांना सांग, शुभमचा कॉल आला होता. सेटलमेंटसाठी अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. लाईनवर ये, नाहीतर मारून टाकेन. पैशांची व्यवस्था कर, नाही तर मौत के लिए तयार हो जा. माझ्याबद्दल त्याला माहिती आहे. मी आधीही त्याला फोन केला आहे. आता फोन नाही येणार, आता डायरेक्ट गोळी येईल,’’ अशी धमकी देण्यात आल्याचे कथित ध्वनीफितमधून समोर आले आहे.

कोण आहे शुभम लोणकर?

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर याने स्वीकारली होती. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी होता. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करीत पिस्तुल आणि काही जिवंत काडतूस जप्त केले होते. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कातील शुभम लोणकरला बंदूक तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी अटक केली होती.