नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेतच्या चारचाकीने नागपुरात रविवारी मध्यरात्री दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली. या अपघात प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधीपक्ष विशेषत: शिवसेनेने भाजप आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. ही घटना काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या मतदारसंघात घडली आहे. त्यानीही यावर भाष्य केले आहे.

विरोधी पक्षांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपवर लक्ष्य केले आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बावनकुळे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसेच आरोपीला वाचवण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेस शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनीही टीका केली आहे.

हेही वाचा >>>भीषण! गोंदियात मुसळधार पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू

सत्ताधारी पक्ष म्हणून भेदभाव नको

राजकीय कुटुंबातील मुलगा असला की राजकारण होते. पण, सत्ताधारी असो विरोधी पक्षाचा आमदार, कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा मुलगा आहे म्हणून झुकते माप द्यायला नको. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तथ्याच्या आधारावर दोषींवर कारवाई झाली पाहिजे. त्यातून दोषी सुटायला नको. हा अपघात माझ्या मतदारसंघातला असल्याने त्यावर लक्ष ठेवून आहे. यात बावनकुळे यांचा मुलगा गाडीत बसून होता, पण तो गाडी चालवत नव्हता, अशी माहिती समोर येत आहे. जर संकेत बावनकुळे वाहन चालवत असेल तर काँग्रेस शांत बसली नसती, असे विकास ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>>गोंदिया : महाविकास आघाडीत वादाची ठिणगी;

राजकारण करायचे नाही

या घटनेतून राजकीय नेत्यांनी आणि मुलांनी बोध घ्यावा. या घटनेचा तपास पोलीस योग्यरितीने झाला पाहिजे. पोलिसांच्या तपासात संकेत बावनकुळे हा चालकाच्या सीटवर नव्हता, तर बाजूला बसला होता, हे पुढे आले. त्यामुळे त्यावर आता आम्हाला राजकारण करायचे नाही. जर पोलिसांच्या पुढील तपासात संकेत बावनकुळे दोषी आढळला तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे.

प्रकरणावर आमचे लक्ष

सुषमा अंधारे यांच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, त्या तिकडे राहतात, ही घटना माझ्या मतदारसंघातील आहे, मला या सगळ्या प्रकरणात जास्त माहीत आहे. त्यांना माहीती नाही. संकेत बावनकुळे कार चालवत असता तर काँग्रेसने त्यांना सोडले नसते. यात तिघे सोबत होते, जेवण करायला गेले की मद्य प्राशन करून वाहन चालवत होते, याचा तपास व्हावा. यात येणाऱ्या दिवसात आणखी काय निष्पन्न होते त्यावर आमचे लक्ष असेल, असेही ठाकरे म्हणाले.