अमरावती :  भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा यांच्‍या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाह यांच्‍या सभेचे आयोजन बुधवारी २४ एप्रिल रोजी येथील सायन्‍सकोर मैदानावर  करण्‍यात आले आहे. मैदानाच्‍या आरक्षणावरून भाजप आणि प्रहार जनशक्‍ती पक्षात संघर्ष उफाळून आला आहे. त्‍यावर प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

महायुतीतील एका पक्षाने अमरावतीतील सभेसाठी परवानगी घेतली होती, तयारीही केली, मात्र  केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी नसतानाही पोलीस बळाचा वापर करत मैदान रिकामे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमरावतीची राजकीय संस्कृती महान आहे. आजपर्यंत या जिल्ह्यात कधीही अशी घटना झालेली नाही.

हेही वाचा >>> गडकरींच्या प्रचारात शाळकरी मुलांचा सहभाग, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

आमचे पक्ष वेगवेगळे असले तरी भारताचे संविधान सर्वोच्च आहे. भारतीय संविधानाने सर्वांना निवडणूक लढण्याचा आणि प्रचार करण्याचा समान अधिकार दिलेला आहे. निवडणूक आयोग बघ्याची भूमिका घेत आहे, ही हुकूमशाहीची सुरुवात आहे. इतक्या वर्षांच्या काँग्रेसच्या सत्तेच्या काळात कधी अशा पद्धतीची दडपशाही केली गेली नाही, असे यशोमती ठाकूर यांनी म्‍हटले आहे.

भाजपने देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू केला आहे. याचसाठी देशात काँग्रेसचे सरकार पाहिजे. ही हुकूमशाही मोडून काढण्यासाठी देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आता या धनशक्तीला अमरावतीतील जनशक्ती हरवल्याशिवाय राहणार नाही, असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

हेही वाचा >>> मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्‍यक्ष आमदार बच्‍चू कडू यांनी येथील सायन्‍सकोर मैदानावर कार्यकर्त्‍यांसह मंगळवारी सायंकाळी धडक दिली. यावेळी त्‍यांचा पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाद  झाला. आम्ही ४, ७ आणि १२ एप्रिल रोजी मैदानाची परवानगी मागितली होती पण, आम्हाला मिळाली नाही. पुन्हा १८ एप्रिल रोजी अर्ज केल्यावर २३ आणि २४ एप्रिलसाठी आम्हाला प्रशासनाने मैदानाची परवानगी दिली आहे. आता देशाचे गृहमंत्री अमित शाह भाजपा उमेदवाराची प्रचारसभा घेण्यासाठी येत असल्याने आमच्यावर प्रशासन मैदानासाठी दबाव टाकत आहे. हे लोकशाही विरोधी असून आम्ही त्याचा निषेध करतो, असे आमदार बच्‍चू कडू म्‍हणाले.