नागपूर : भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थितीमुळे दिल्लीला धोका होऊ शकतो. दिल्ली देशाची राजधानी आहे आणि या शहरामध्ये सर्वात महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांची आणि धोरणात्मक कक्ष आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या युद्धाच्या किंवा लष्करी आक्रमणांच्या धोका लक्षात घेता देशाची राजधानी नागपूरला हलविण्याची मागणी कॉँग्रेसच्या एका माजी खासदाराने केली. ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळात कोलकाता (कलकत्ता) ही भारताची राजधानी होती.
मात्र, प्रशासनात सुलभता, दिल्लीचे भौगोलिक स्थान आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन १२ डिसेंबर १९११ रोजी किंग जॉर्ज पंचम यांच्या उपस्थितीत दिल्ली ही नवी राजधानी म्हणून जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवी दिल्लीचे नियोजन आणि बांधकाम प्रसिद्ध वास्तुविशारद एडविन ल्युटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केले. १९३१ साली नवी दिल्ली अधिकृतपणे राजधानी म्हणून कार्यान्वित झाली. मात्र आता भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रांच्याजवळ असल्याने नागपूरला राजधानी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुणी केली मागणी?
राजधानी दिल्लीला असलेला संभाव्य धोका लक्षात घेता, आपत्कालीन पर्यायी म्हणून राज्याची उपराजधानी नागपूरचा विचार देशाची राजधानी म्हणून करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री खासदार विलास मुत्तेमवार यांनी केली आहे. यासंदर्भात मी लोकसभेत अनेक वेळा ही मागणी केली. आज भारत पाकिस्तान तणावाच्या स्थितीतही माझी हीच मागणी आहे, असेही ते म्हणाले. मुत्तेमवार म्हणाले, २००१ आणि २०१३ मध्ये मी संसदेत ही मागणी केली आणि नंतर एक महिन्यातच संसदेवर हल्ला झाला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे ही मागणी केली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुत्तेमवार यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागपूरला देशाची पर्यायी राजधानी करण्याची मागणी केली आहे.
यापूर्वीही झाली आहे मागणी नागपूरला भारताची राजधानी बनवण्याचा विचार काही वेळा करण्यात आला आहे. १९३० च्या दशकात ब्रिटिश राजवटीच्या काळात, भारतात अनेक ठिकाणी राजधानी बदलण्यावर चर्चा झाली होती. नागपूरच्या भौगोलिक स्थानामुळे आणि मध्य भारतात स्थित असल्यामुळे, त्याला राजधानी बनवण्याचा विचार काही काळ केला गेला होता. यानंतर १९५० च्या दशकात याबाबत पुन्हा चर्चा झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर, विशेषत: १९५० च्या दशकात, नागपूरला राजधानी बनवण्याचा विचार झाला. कारण दिल्ली जास्त पूर्वेतील भागात स्थित होती आणि भारतीय राज्यसंस्थेची सर्व प्रमुख कार्यालये तसेच संसद दिल्लीमध्ये होते. काही लोकांना मध्य भारतातील नागपूर अधिक योग्य ठिकाण वाटत होते. यामुळे एकूणच नागपूरच्या संभाव्यतेवर चर्चा होती, परंतु या विचाराला तांत्रिक, राजकीय आणि इन्फ्रास्ट्रक्चरल आव्हानांचा सामना करावा लागला.