पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या ‘त्या’ माजी मंत्र्यांना समज देण्याचे धारिष्टय़ नाही

शेतकरी कर्जमाफी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पहिल्यांदाच विरोधीपक्षाच्या भूमिकेत दिसलेल्या काँग्रेसला पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागपुरातील माजी मंत्र्यांना समज देण्याचे धारिष्टय़ दाखवता आलेले नाही. स्वातंत्र्यानंतर कायम सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला गेल्या अडीचतीन वर्षांपासून सत्तेपासून परागंदा व्हावे लागल्याने काँग्रेस नेतृत्वाने पक्षाचे ध्येयधोरणही नेते, पदाधिकाऱ्यांकडून राबवून घेण्याचे बळ गमावले की, काय अशी स्थिती आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यांवर संपूर्ण विरोधीपक्ष एकत्र आला. चंद्रपूर जिल्ह्य़ातील पळसगाव येथून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचे सात्वन करून यात्रेला प्रारंभ झाला. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भाचे बुरूज ढासळले आहे. कायम सत्तेत असलेल्या काँग्रेसने नेत्यांची जनतेशी नाळ तुटली होती. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शेतकरी आणि शेतमजूर, ग्रामस्थांमध्ये जाण्याची संधी होती. ग्रामीण जनतेचा विश्वास संपादन करण्याची संधी होती. यासाठी नेते, पदाधिकाऱ्यांनी एकजूट दाखवत संघर्ष यात्रेत सहभागी होणे अपेक्षित होते. प्रदेश काँग्रेसच्या तशा सूचना देखील होत्या. परंतु विदर्भात संघर्ष यात्रा असताना ज्येष्ठ विलास मुत्तेमवार दिल्लीत होते. तर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि अनीस अहमद यांनी पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. पक्षाच्या बळावर मंत्रीपद भोगलेल्या नेत्यांना पक्षाला देण्याची वेळी आली आहे. पण सत्तेत नसताना देखील या नेत्यांमधील विस्तव जात नाही. वैयक्तिक लाभाच्यावर जाण्यास या नेत्यांची तयारी दिसत नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी झालेल्या पक्षाने दिलेल्या कार्यक्रमात नागपुरातील काही नेत्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आमदारांचे निलंबन या प्रमुख मुद्यावरून काढलेल्या संघर्ष यात्रेत मात्र शहरातील एकाही बडय़ा नेत्यांनी सहभागी होणे आवश्यक समजले नाही. पुढील काही महिन्यात नागपूर जिल्हा परिषद निवडणूक असल्याने ग्रामीणमधील नेत्यांनी सक्रिय सहभाग दाखवला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने संघर्ष यात्रेचा कार्यक्रम निश्चित  केला होता. त्यासंदर्भात सगळ्या नेत्यांना सूचना प्राप्त झाल्या. पण वैयक्तिक राजकीय लाभ डोळ्यासमोर ठेवून आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही, हे ठरवत असलेल्या नेते संघर्ष यात्रेकडे फिरकलेच नाहीत. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही ठोस भूमिका घेण्याचे टाळले आहे. नागपुरातील नेते यात्रेत सहभागी न होण्याबद्दल ते म्हणाले, त्यांनाच विचार ते का सहभागी झाले नाहीत. हे नेते कुठे व्यस्त असतील, असे सांगून भूमिका घेण्याचे टाळले. नागपुरातील व्हरायटी चौकातील सभेत शहरातील नेते मंडळी दिसली नाही. त्यावर ते म्हणाले, नागपूरची सभा नियोजित नव्हती. ऐनवेळी आयोजित करण्यात आली होती, असेही ते म्हणाले.

आमदार सुनील केदार यांच्या आग्रहखातर नागपुरातील सभा आयोजित करण्यात आली. यात्रेचा मार्ग बुटीबोरी ते कोंढाळी आणि पुढे अमरावती असा निश्चित झाला होता. परंतु शहरात शक्तिप्रदर्शन करण्यासाठी येथे सभा घेण्यात आली. काँग्रेसच्या पडत्या काळात विदर्भाने साथ दिली. परंतु अशा नेत्यांच्या भरवश्यावर काँग्रेसला गतवैभव प्राप्त होणे दिवास्वप्न ठरण्याची शक्यता आहे.