संघ विचारसरणीच्या भाजप नगरसेवकाला नागपूरमध्ये काँग्रेसकडून उमेदवारी

काँग्रेसने नागपुरात मात्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संघ स्वयंसेवक,भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर व नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली आहे.

नागपूर : काँग्रेसने नागपुरात मात्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून संघ स्वयंसेवक,भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर व नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली आहे. ते उद्या मंगळवारी २३ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भोयर यांनी रविवारी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला व सोमवारी  काँग्रेसमध्ये प्रवेश केला. डॉ. छोटू भोयर यांचे संपूर्ण कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळले आहे. वडील दिवंगत डॉ. प्रभाकर भोयर हे १९४९ ते १९५६ या काळात संघाचे प्रचारक होते. १९८५ ते १९९५ या काळात नागपूर ग्रामीणचे संघचालक म्हणून तर १९९८ ते २०१० पर्यंत रेशीमबाग भागाचे संघचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या आई दिवंगत ताराबाई जनसंघाच्या कार्यकर्त्यां होत्या. १९९२ मध्ये त्या भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यांचे मामा सुप्रसिद्ध होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे हेसुद्धा संघाशी जुळले होते. संघांच्या विचारसरणीतच वाढलेले छोटू भोयर ३४ वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय होते. ते १९९७, २००१, २०१७ मध्ये भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले. २००१ मध्ये ते उपमहापौर होते. २०१२-२०१७ या दरम्यान ते नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त होते. संघटनात्मक पातळीवरही त्यांनी अनेक पदे भूषवली.

डावलल्याने नाराजी

याआधी त्यांनी पक्षाकडे दक्षिण नागपूरमधून विधानसभेसाठी दोन वेळा उमेदवारी मागितली होती. या निवडणुकीसाठीही (विधान परिषद) त्यांनी शहर अध्यक्षांकडे अर्ज केला होता. पण पक्षाकडून डावलले जात असल्याचे संकेत मिळाल्यावर त्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress nominee bjp corporator nagpur ysh

Next Story
संपाचा सर्वसामान्यांना फटका!
ताज्या बातम्या