मंत्री राऊत, वडेट्टीवार यांची मुले उमेदवारीसाठी इच्छुक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उदयपूर चिंतन बैठकीत एका कुटुंबातील एकाच सदस्याला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा ठराव संमत केला. काँग्रेसचे हे धोरण पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राजकारणात सक्रिय असलेल्यांना लागू होणार नसल्याने विदर्भ काँग्रेसमधील घराणेशाहीवर या ठरावाचा विशेष फरक पडणार नसल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसने या ठरावातून पाच वर्षे राजकारणात सक्रिय असलेल्यांना वगळले आहे. याचा फायदा विदर्भातील काँग्रेसमधील राजकीय घराण्यांना होऊ शकतो. काँग्रेसचे बहुतांश मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या मुला-मुलींना यापूर्वीच पक्षाच्या विविध संघटनांच्या माध्यमातून सक्रिय केले आहे. युवक काँग्रेस, एनएसयूआयमध्ये पदाधिकारी किंवा प्रदेश कार्यकारिणीवर त्यांची वर्णी लावून घेतली आहे. संघटनेत पदाधिकारी असणे म्हणजे राजकारणात सक्रिय असणे, असे ग्राह्य धरल्यास या धोरणाचा विदर्भातील नेत्यांवर परिणाम होणार नाही, असे नेतेच सांगतात. 

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत त्यांचे पुत्र कुणाल राऊत  व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी पुढील विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते. कुणाल राऊत यांची अलीकडेच प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली तर शिवानी वडेट्टीवार या युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. त्यामुळे एक कुटुंब, एक, तिकीट धोरण त्यांना अडचणीचे ठरणार नाही. महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांची कन्या आकांक्षा ठाकूर एनएसयूआयच्या पदाधिकारी आहेत. आमदार विकास ठाकरे यांचे पुत्र केतन ठाकरे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे पुत्र परिक्षित जगताप हे देखील प्रदेश कार्यकारिणीवर आहेत. माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांचे पुत्र राहुल ठाकरे यांना यापूर्वी विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या पुत्र राहुल पुगलिया यांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे, हे येथे उल्लेखनीय.

अकोल्यातील माजी मंत्री अजहर हुसेन यांचे पुत्र जिशान हुसेन आणि माजी आमदार सुधाकरण गणगणे यांचे पुत्र महेश गणगणे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे याचे पुत्र प्रकाश तायडे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर विद्यमान आमदार सुलभा खोडके, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचे पुत्र अद्यापतरी पक्ष संघटनांमध्ये सक्रिय नाहीत. मात्र, ज्या नेत्यांची पुढची पिढी पूर्वीपासून पक्षात सक्रिय असेल, त्यांना उमेदवारी देण्यात हा ठराव बाधा ठरू शकणार नाही.

पती खासदार अन् पत्नी आमदार

सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आणि खासदार झाले. ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहेत. त्यांच्या पत्नी प्रतीक्षा धानोरकर या काँग्रेसच्या आमदार आहेत. यावरून ‘एक कुटुंब, एक तिकीट’ हे धोरण विदर्भ काँग्रेसमधील राजकीय घराणेशाहीला आळा घालण्यास उपयोगी ठरणार नसल्याचे बोलले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress one family one ticket policy useless children minister raut and vadettiwar aspiring candidature ysh
First published on: 18-05-2022 at 00:02 IST