चंद्रपूर : महापौर व गटनेतापदावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही नेत्यांमधील वाद आता दिल्लीदरबारी पोहोचला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी आज दिल्लीत चंद्रपुरातील काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी वेणुगोपाल यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी चंद्रपूर येथून नगरसेवक, नगराध्यक्ष यांची फौज दिल्लीत उतरवली.
खासदार धानोरकर यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस नेते सुनील केदार, निरीक्षक चौधरी तसेच काही पदाधिकारी असल्याची माहिती आहे. तर वडेट्टीवार मंगळवारी दुपारी या बैठकीसाठी समर्थक १९ नगरसेवक, विधानसभा उमेदवार प्रविण पडवेकर, घुग्घुसचे नगरसेवक राजु रेड्डी, घुघूस नगराध्यक्ष, मूल नगराध्यक्ष तसेच काही आजी माजी पदाधिकारी यांच्यासह ३० ते ३५ जण घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत.

