चंद्रपूर: संघटन सृजन अभियानांतर्गत सिव्हील सोसायटी पासून पत्रकार तर जिल्हाध्यक्ष, खासदार, आमदार पासून सामान्य कार्यकर्ता या सर्वांसोबत वन टू वन चर्चा करून आणि तीन ते पाच हजार नागरिकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संवाद साधून सविस्तर टिपणीसोबत सहा सर्वाेत्तम नावे दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर काँग्रेस सरचिटणीस व प्रदेश प्रभारी योग्य व्यक्तीची ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष पदी निवड करणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेसचे निरीक्षक संतोष कोलकोंडा, प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अभय छाजेड यांनी दिली.

एनडी हॉटेल येथे खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष संतोष लहामगे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रेय यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत कोलकोंडा व छाजेड यांनी जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेची माहिती दिली. ५ एप्रिल रोजी चंदपूर महापालिका, ६ एप्रिल राजुरा विधानसभा मतदार संघ, ७ बल्लारपूर, ८ वरोरा, ९ चिमूर व १० एप्रिल रोजी ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघात बैठक घेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जाणार आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत, सक्षम व कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे.

 संघटन बळकटीकरण, कार्यकर्त्यांशी समन्वय, बूथस्तरावरील संघटन वाढविणे, पक्ष संघटनेत आवश्यक बद्दल तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभावी रणनीती यावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेवून सखोल चर्चा करण्यात आली अशी माहिती दिली. संघटन सुदृढ असेल तरच पक्ष जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर सक्रिय होऊन पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविणार असल्याचे सांगितले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी सर्वांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यामध्ये एकूण सहा कॅटेगरीत अर्ज दाखल करता येणार आहे. १८ ब्लॉक तयार करण्यात येणार असून ब्लॉक अध्यक्षाची निवड याच माध्यमातून केली जाणार आहे.

 पारदर्शक पध्दतीसाठी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. काँग्रेस संघटन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. केवळ जिल्हा व शहर काँग्रेस नाही तर सेवादल, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, अल्पसंख्यांक सेल या प्रत्येक सेलचे अध्यक्ष अशाच पध्दतीने निवडण्यात येणार आहे अशीही माहिती निरीक्षक संतोष कोलकोंडा यांनी दिली.