Sonia Gandhi ED Interrogation: नागपूर : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाने दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले. त्याविरुद्ध नागपूर शहर काँग्रेसने संविधान चौकात सत्याग्रह सुरू केला आहे. केंद्रातील भाजपचे सरकार राजकीय सूडबुद्धीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीसह अनेक नेत्यांना लक्ष्य करीत आहे. केंद्र सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व धोरण यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नाहक त्रास देण्यात येत आहे,असा आरोप शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला.

केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणांविरोधात संविधान चौकात सत्याग्रह काँग्रेसने सत्याग्रह सुरू केला आहे. आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, ॲड. अभिजीत वंजारी, समाज माध्यम शाखेचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, उद्योग व वाणिज्य सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा उपस्थित होते.

युवक काँग्रेसने मोदींचा पुतळा, कार जाळली

दरम्यान युवक काँग्रेसने आज दुपारी सव्वातीनच्या सुमारास नागपुरातील जी.पी.ओ.चौकात चारचाकी वाहन आणि पंतप्रधान मोदी यांचा पुतळा जाळला.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत आणि प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने आग विझवली. पोलिसांनी आंदोलक कुणाल राऊत, शिवानी वडेट्टीवार, तनवीर विद्रोही, प्रदीप शिंघाव, श्रीनिवास सालमवार, वसिम खान यांना ताब्यात घेतले.