पक्ष यंत्रणा ढिम्म तरीही विदर्भात काँग्रेसला यश; राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा भाजप दुसऱ्या क्रमांकावर

सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्ष भाजपनेत्यांनी त्यांचे गड राखले तर काहींना फटका बसला.

|| चंद्रशेखर बोबडे

राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा भाजप दुसऱ्या क्रमांकावर

नागपूर : जनता लाटेतही विदर्भाने काँग्रेसला साथ दिली होती. काँग्रेस पक्ष देशभर कमकुवत झाला असला तरी विदर्भाने नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसलाच कौल दिला आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपला विदर्भात मात्र दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या विरुद्ध वातावरणनिर्मिती करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाची प्रचारी यंत्रणा चोवीस तास सक्रिय असताना आणि तेवढीच काँग्रेस सर्वच पातळीवर ढिम्म असताना कॉंग्रेसने त्यांच्या जुन्या किल्ल्यात मारलेली मुसंडी लक्षणीय ठरली. याचे श्रेय हा पक्ष जिवंत राहावा म्हणून कष्ट उपसणाऱ्या कार्यकर्त्यांचे तसेच पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास असणाऱ्या जुन्याजाणत्या मतदारांचेही म्हणावे लागेल. विशेष म्हणजे प्रथमच या पक्षापासून दुरावलेला युवक वर्ग पुन्हा या पक्षासोबत जुळत असल्याचे मिळालेल्या जागांववरून दिसून येते.

विदर्भात २९ नगर पंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला १७२, भाजप ११६, राष्ट्रवादी ६७, सेना ४८, अपक्ष ४३ आणि इतर आघाडय़ा व पक्षांना ४३ जागा मिळाल्या.

सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्ष भाजपनेत्यांनी त्यांचे गड राखले तर काहींना फटका बसला. अमरावती जिल्ह्यात तिवसा नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १२ जागा जिंकल्या. या ठिकाणी भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. तुलनेत सेनेला चार जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील आपले खाते उघडता आले नाही. या निकालाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना बळ मिळाले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने बुलढाणा जिल्ह्यात खाते उघडले असून तेथील संग्रामपूर नगरपंचायतीत संघटनेने बहुमत मिळवले आहे. नागपूर जिल्ह्यात सुनील केदार व नितीन राऊत असे काँग्रेसचे दोन मंत्री आहेत. या जिल्ह्यातील हिंगणा नगर पंचायतीत भाजपने झेंडा फडकावला. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेने जिल्ह्यातील भातकुली नगर पंचायतीवर विजय मिळवला आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक जागा जिंकून गतवैभव मिळवले. या सहाही नगर पंचायतींमध्ये भाजपचे आमदार असताना पक्षाला राळेगाव व झरी जामणी येथील सत्ता गमावून दारुण पराभवाचा सामना करावा लागला. शिवसेनेचे संख्याबळ २५ वर गेले. तर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात प्रभावहीन ठरली. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळय़ात काँग्रेसचा झेंडा फडकला. वाशिम जिल्ह्यात मानोरा नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व निर्माण केले. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १४ जागांवर बाजी मारली. काँग्रेसला दोन, तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना व वंचित बहुजन आघाडीला खातेही उघडता आले नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात घवघवीत यश संपादन केले. सहापैकी सावली, कोरपना, सिंदेवाही आणि गोंडिपपरी या ठिकाणी कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले. जिवती येथे काँग्रेस- राष्ट्रवादी युतीने बाजी मारली तर पोंभूर्णा नगर पंचायत माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपने पुन्हा ताब्यात घेतली. सहा नगर पंचायतीच्या १०२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक ५३ उमेदवार निवडून आले. तर भाजपचे कमळ २४ ठिकाणी फुलले, शिवसेना सहा, गोंडवाना गणतंत्र पार्टी पाच, बहुजन वंचित आघाडी दोन आणि अपक्ष चार उमेदवार निवडून आले. गोंदिया जिल्ह्यातील ३ नगर पंचायतीच्या ५१ जागांपैकी राष्ट्रवादीला १३, भाजप व काँग्रेसला प्रत्येकी १० जागा मिळाल्या. वर्धा जिल्ह्यातील ३ नगर पंचायतीतील ६८ पैकी २१ जागा काँग्रेसने जिकंल्या. बुलढाणा जिल्ह्यात दोन नगर पंचायतीतील ३४ जागांपैकी १६ काँग्रेसला मिळाल्या, प्रहारने १२ तर सेनेने ५ जागा जिकंल्या. भाजप नेते संजय कुंटे यांना या निवडणुकीत धक्का बसला.

भंडाऱ्यात पटोलेंना, तर गोंदियात पटेल यांना धक्का

विदर्भात काँग्रेसला लक्षणीय यश मिळाले असले तरी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना तसेच राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना त्यांच्या गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत फटका बसला. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पटोले यांनी तेथे तळ ठोकला होता. येथे एकूण ५२ जागांपैकी काँग्रेसला २१ जागाच जिकंता आल्या. राष्ट्रवादीला १३, भाजप १२, सेनेला एक जागा मिळाली. विदर्भातून राष्ट्रवादीचे दुकान बंद करणार असे वक्तव्य पटोले यांनी काही महिन्याआधी केले होते. आता त्यांना जिल्हा परिषदेत पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे. स्वबळावर निवडणुक जिंकण्याचे नानांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

गोंदियात राष्ट्रवादीला फटका

गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीला जोरदार झटका बसला. जिल्हा परिषदेच्या ५३ पैकी २६ जागा जिंकून भाजपने मुसंडी मारली. राष्ट्रवादीला येथे केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसने येथे १३ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे २० जागा होत्या. त्यांना १२ जागांचा फटका बसला. भाजपकडे १७ जागा होत्यात त्यंच्या ९ जागा वाढल्या. काँग्रेसलाही तीन जागांचा फटका बसला.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress shivsena bjp is the second largest party in the state akp

Next Story
वीज ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांवर पोलीस कारवाई
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी