यवतमाळ : यवतमाळ नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी जवळपास निश्‍चित झाली आहे. मात्र, नगराध्यक्ष पदावरून काँग्रेस तसेच शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ओढाताण सुरू असल्याने दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरवात झाली असली तरी अजूनही महाविकास आघाडी, महायुतीची घोषणा झालेली नाही. यवतमाळ नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होणार असल्याचे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप स्पष्ट घोषणा कोणीही केलेली नाही.

शिवसेनेत फूट पडायच्या आधी यवतमाळ नगरपालिकेत शिवसेनेचा नगराध्यक्ष होता. तर त्यापूर्वी नगरपालिकेची सत्ता काँग्रेसकडे होती. त्यामुळे नगराध्यक्ष पदावर दोन्ही पक्ष दावा सांगत आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांनी तुर्तास नगराध्यक्ष पदासाठी नंतर बोलणी करू, असे ठरवून महाविकास आघाडीत नगरपालिका निवडणुकीत उमेदवार देण्याची तयारी केली आहे. तशी बोलणी शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसमध्ये झाली आहे. यवतमाळ नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अस्तित्व नसल्याने या पक्षाची निवडणुकीत कुठेच तयारी दिसत नाही.

शिवाय महाविकास आघाडीबाबतही राष्ट्रवादीने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. पक्षाचा जिल्हाध्यक्ष नुकताच बदलविण्यात आल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये गोंधळाचे चित्र आहे. मात्र ऐनवेळी राष्ट्रवादी (शप) महाविकास आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.

सध्यातरी शिवसेना (उबाठा) तसेच काँग्रेस एकत्रितपणे यवतमाळ नगरपालिका निवडणुकीस समोरे जाणार आहे. काँग्रेस अधिक जागा लढणार आहे. स्थानिक आमदार काँग्रेसचा असल्याने नगरपालिकाही ताब्यात असावी, यासाठी काँग्रेसचा प्रयत्न आहे. शिवाय, नगरपालिका प्रशासनाचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यास नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. या माजी अधिकाऱ्याच्या उमेदवारीसाठी तांत्रिक अडचणी आल्या नाही तर, काँग्रसेची लॉटरी लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवाय काँग्रेसने प्रभागातही जोरात तयारी सुरू केली आहे. बहुतांश प्रभागातील उमेदवार निश्‍चित केले असून उमेदवारी मिळेल या आशेने अनेकांनी प्रचारही सुरू केला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये कोणीच वाली नसल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही माजी नगरसेवकांनी राजीनामा देवून भाजपमध्ये उमेदवारी मिळविण्याच्या अटीवर प्रवेश घेतला. त्यामुळे अनेक प्रभागात या पक्षातील कार्यकर्तेच एकमेकांच्या विरोधात उभे राहण्याची शक्यता आहे.

वंचित स्वबळावर

नगरपालिका निवडणुकीतही बहुजन वंचित आघाडीत स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे. वंचितने काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काँग्रेसने कोणतहाी प्रतिसाद न दिल्याने वंचित आता स्वबळावर निवडणूक लढवून नगराध्यक्षपदासह प्रभागांमध्ये उमेदवार देणार असल्याचे वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी सांगितले.