श्रीहरी अणेंचा काँग्रेस नेत्यांना सल्ला
विदर्भातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर आंदोलन केले. त्यावेळी देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता असल्यामुळे नेत्यांनी हा विषय दाबण्याचा प्रयत्न केला. विदर्भाचा मुद्दा हा भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांनी विदर्भ काँग्रेस कमिटी स्थापन करावी, असा सल्ला विदर्भावादी नेते माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी दिला.
चिटणीस पार्कमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतंत्र विदर्भाची मागणी जास्तच महत्त्वाची आहे. आतापर्यंत विदर्भातील अनेक काँग्रेस नेत्यांनी ही मागणी उचलून धरली.
देशात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असताना त्यांच्या पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी विदर्भातील नेत्यांना बोलू दिले नाही. माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी त्यावेळी विदर्भ काँग्रेस कमिटीची स्थापना केली होती. त्यामुळे त्याच धर्तीवर विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांना स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून स्वतंत्र संघटना निर्माण करण्याची संधी आहे आणि संधीचा त्यांनी फायदा घ्यावा. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचे भवितव्य सुरक्षित राहील, असा सल्ला अणे यांनी दिला.
विदर्भाचे आंदोलन हे तेलंगणासारखे उग्र होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आजपर्यंत शांततेत आंदोलने केली आणि पुढे करीत राहणार आहोत. मात्र, गेल्या काही दिवसात विदर्भाच्या बाजूने जनमत वाढत असताना त्यांच्या भावना तीव्र होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हे आंदोलन उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
विदर्भाच्या मुद्यावर काँग्रेसची दुटप्पी भूमिका लक्षात घेता सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत विदर्भवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मुद्यावर निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले. स्वतंत्र विदर्भाला जे समर्थन करतील त्यांच्या बाजूने लोक कौल देतील. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावरून भाजपच्या नेत्यांचा जनतेला विश्वास राहिला त्यांचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.