बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाई आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात बुलढाण्यात आज काँग्रेसकडून मूक मोर्चा काढण्यात आला. समारोपात हुतात्मा स्मारक परिसरात सत्याग्रह करून कारवाईचा निषेध करण्यात आला. या 'गांधीगिरी' निमित्त जिल्ह्यातील काँग्रेस नेते व पदाधिकारी एकवटल्याचे दिसून आले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिय संगम चौक येथून आज शुक्रवारी या मूक मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी आमदार धीरज लिंगाडे, विजय अंभोरे, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, अॅड. विजय सावळे हे प्रमुख नेते होते. जयस्तंभ चौक, बाजार पेठ, जनता चौक, कारंजा चौक, भोंडे सरकार व तहसील चौक मार्गे मोर्चा काढण्यात आला. तोंडावर, हातावर लावलेल्या निषेधात्मक काळ्या पट्ट्या आणि कोणत्याही घोषणा न देता निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला. मोर्चाचा समारोप स्थानिय हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. यावेळी तिथे सत्याग्रह करण्यात येऊन कारवाईचा मौन निषेध करण्यात आला. हेही वाचा - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनीही समाजमाध्यमांवर ठेवले ‘मी सावरकर’ लिहिलेले छायाचित्र मोर्चात बाबासाहेब भोंडे, संतोष आंबेकर, तेजेंद्रसिंह चौहाण, एकनाथ खर्चे, गणेशसिंग राजपूत, विनोद बेंडवाल, प्रमोद अवसरमोल, वसंत देशमुख, चित्रांगण खंडारे, नंदकिशोर बोरे, तुळशीराम नाईक, डॉ. देवकर, आदी लोक सहभागी झाले. हेही वाचा - महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी केरळच्या समुद्रकिनारी पालीच्या नव्या निशाचर प्रजातीचा लावला शोध संघर्ष करणार केंद्र सरकारचे हुकूमशाही धोरण व राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या कारवाईविरोधात काँग्रेस प्राणपणाने लढणार, असे संजय राठोड यांनी मोर्चापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले. लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी फक्त बोलघेवड्या चर्चा करण्यापेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून सामान्य नागरिकांनीही रस्त्यावर उतरणे काळाची गरज आहे. सदर प्रकार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुक मोर्चा काढण्यात आल्याचे राठोड यांनी सांगितले.