प्रसंग एक – महापालिकेच्या निवडणूक काळातली गोष्ट. दोन आमदारांमधील भांडणामुळे काहीही केले तरी चंद्रपुरात विजय मिळवणे कठीण हे लक्षात आल्यावर सत्ताधाऱ्यांचे वर्तुळ अस्वस्थ झाले. वारंवार केलेली सर्वेक्षणे सुद्धा विजय दुरापास्त असेच सांगत होती. आता उपाय एकच. काँग्रेसमधील मित्रांना कामाला लावणे. लगेच एका नेत्याला फोन केला गेला. काहीही करा, चंद्रपुरात जा व पक्षाच्या उमेदवारीत वाटा मागा. यामागचा हेतू एकच होता. सत्तापक्षात जशी गटबाजी सुरू आहे तशी काँग्रेसमध्येही सुरू करायची. निरोप मिळताच हा मित्र कम् नेता थेट परदेशातून परतला. चंद्रपुरात तळ ठोकून इच्छुकांची जमवाजमव करू लागला. कार्यक्षेत्र नसताना! परिणाम व्हायचा तोच झाला. काँग्रेसच्या बाजूने असलेले वातावरण हळूहळू बदलू लागले. तरीही जनतेच्या मनातला सत्ताधाऱ्यांविषयीचा राग कायम होता. त्याचे प्रतिबिंब निकालात उमटले. काँग्रेसमध्ये भांडणे लावूनही सत्ताधाऱ्यांना पूर्ण बहुमत मिळू शकले नाही. मग महापौरपदाचा खेळ रंगला. तोवर काँग्रेमधील भांडणाने गंभीर स्वरूप धारण केले होते. त्याचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी हे पद मिळवले. निसटता का होईना पण फायदा झालाच. काँग्रेसला हात चोळत बसावे लागले. सत्ताधारी काँग्रेसी मित्रावर खूश झाले.
प्रसंग दोन – नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीचा काळ. ती बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. पूर्व विदर्भातील एका काँग्रेसच्या उमेदवाराला गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळातील एका नेत्याने त्यांना थेट फोन केला. ऑफर दिली. हा संवाद सुरू असतानाच या नेत्याने थेट प्रदेश प्रमुखालाच कॉन्फरन्सवर घेऊ का असे उमेदवाराला विचारले. हे ऐकून तो चाट पडला. एवढे करूनही माघारीसाठी होकार मिळत नाही हे बघून मग पुन्हा मित्राची मदत घेण्यात आली. माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी हा उमेदवार नागपूरला यायला निघाला. या प्रवासात त्यांचे ज्यांच्याशी बोलणे झाले त्या सर्वांना माघार घेणार नाही असेच त्याने सांगितले. नागपुरात सत्ताधाऱ्यांच्या मित्राच्या घरी पोहचताच अचानक सूत्रे फिरली. तिथून बाहेर पडताच हा उमदेवार थेट अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला व कुणाला न सांगता माघार घेऊन मोकळा झाला. मित्राच्या भेटीत नेमके काय घडले? तिथे सत्ताधाऱ्यांच्या वतीने कोण हजर होते हा तपशील ठाऊक असूनही येथे नमूद करण्याची गरज नाही. या माघारीची किंमत किती होती? त्यातले वाटेकरी कोण होते हे काँग्रेसमधील दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांना ठाऊक.
प्रसंग तीन – हाच विधान परिषद निवडणुकीचा काळ. अमरावतीत काँग्रेसमध्ये नेते भरपूर असल्याने माघारीचा प्रयोग यशस्वी होणार नाही याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आधीच आलेली. म्हणून नवे डावपेच आखण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका विद्यमानाने नागपूरचा एक उद्योजक उमेदवार निवडला. त्याला काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडे पाठवण्यात आले. यालाच उमेदवारी द्या असा आग्रह धरला गेला. आपण सारे राणाविरोधक. तुम्ही आता मदत करा, नंतर हे दाम्पत्य रिंगणात असेल तेव्हा मी मदत करेन अशी ऑफर उमेदवाराच्या वर्तुळातून काँग्रेसच्या नेत्यांना देण्यात आली. निवडणुकीत पराभव तर निश्चित आहे पण पैसेवाला उमेदवार दिला तर किमान पक्षाची मते सुरक्षित राहतील असा विचार या नेत्यांनी केला. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांचे डावपेच वेगळेच होते. काँग्रेसने हा उमदेवार निश्चित केल्यावर सत्ताधाऱ्यांनी त्याला आजारी पाडले. रुग्णालयातून प्रचार करणारा उमेदवार विदर्भाने प्रथमच बघितला. सत्ताधाऱ्यांच्या डावपेचात आपण पुरते अडकलो याची जाणीव काँग्रेसनेत्यांना जेव्हा झाली तोवर उशीर झाला होता. यामुळे काहींची झालेली चरफड चित्रफितीतून बघायला मिळाली. शेवटी त्यांनी पक्षाच्या मतदारांनी मतदान करू नये असा फतवा काढला पण विश्वास गमावलेल्या या नेत्यांचे मतदारांनी ऐकले नाही. दामदुप्पट किंमत वसूल करून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात मते टाकली. रुग्णालयात बसून टिवटिव करणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतपेटीतून भोपळा मिळाला पण बाहेर जे कोहळे हाती लागले त्याचा आकार कितीतरी मोठा होता.
प्रसंग चार – पुन्हा तेच. विधान परिषद निवडणुकीचा काळ. सत्ताधाऱ्यांना राज्यात अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात यश मिळाले. अपवाद फक्त नागपूरचा. इथे या प्रयत्नांची डाळ शिजली नाही. सध्या कठीण काळातून जात असलेल्या काँग्रेससाठी ही समाधानाची गोष्ट ठरली. किमान अशावेळी तरी पक्षातील सर्वांनी एकजुटीचे प्रदर्शन घडवावे ही सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा. मात्र त्याकडे पाठ फिरवलेल्या काही नेत्यांनी इथेही निष्ठेला खुंटीवर टांगलेच. प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षाची अनेक मते फुटली. नागपूर महापालिकेतील ७० टक्के मते सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात पडली. नाही जनाची तर मनाची तरी या म्हणीचा विसर या साऱ्यांना पडला. यामागे कोण होते? त्यांच्या सूचना काय होत्या या प्रश्नांची उत्तरे साऱ्यांना ठाऊक. नागपूरच्या ग्रामीण भागातही मते विकण्याचा धंदा अगदी तेजीत होता. गंमत म्हणजे आता हेच मतदार व नेते आम्ही काँग्रेसचे कसे निष्ठावान असे सांगत सत्ताधाऱ्यांविरुद्ध आंदोलन करताना दिसतात.
प्रसंग पाच – काळ पुन्हा तोच. विधान परिषद निवडणुकीचा. ती जाहीर झाल्याबरोबर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे मतदार थेट तीर्थाटनाला निघाले. त्यांना नेले कुणी तर सत्ताधाऱ्यांनी. यात काँग्रेसच्या एका लोकप्रतिनिधीने महत्त्वाची भूमिका बजावली. नगर पंचायत, नगर परिषदेत पक्षाकडून निवडून आलेले मतदार स्वत:हून सत्ताधाऱ्यांच्या हवाली करून तो मोकळा झाला. पक्षाच्याच काही नेत्यांनी त्यांना विचारले असे का केले म्हणून. त्यावर त्याचे उत्तर होते, पक्षाकडून कुणी संपर्कच साधला नाही व मतदार घाई करायला लागले होते. मग म्हटले त्यांना, कुणासोबत जायचे असेल तर जा. हे उत्तर ऐकून नेते चाटच पडले. पक्षनिष्ठेला उघडपणे तिलांजली दिल्यावर इतका साळसूदपणा दाखवणारा हा लोकप्रतिनिधी पूर्वी शिक्षक होता.
या पाचही प्रसंगातून एकच गोष्ट ठळकपणे जाणवते ती म्हणजे या पक्षाला खड्ड्यात टाकायला विरोधकांची गरजच नाही. यात सक्रिय असलेले नेते, कार्यकर्ते त्यासाठी कमालीचे सक्षम आहेत. या सर्वांच्या निष्ठाविक्रीच्या कथा केव्हाच दिल्लीदरबारी पोहोचल्या. या सर्वांना पक्षातले सत्ताधाऱ्यांचे स्लीपरसेल असे संबोधले जाते. मागे एकदा राहुल गांधी गुजरातच्या एका सभेत म्हणाले होते. ‘जे पक्षात राहून सत्ताधाऱ्यांना मदत करतात त्यांनी लगेच चालते व्हावे.’ म्हणजे पक्षाचा त्याग स्वत:हून करावा. त्यांचे हे विधान कुणीच मनावर घेतले नाही व घेणारही नाही. हे स्लीपरसेल सत्ताधाऱ्यांच्या वर्तुळात थेट सामील झाले तर त्यांना तिथे कुणीही विचारणार नाही. त्यांची किंमत केली जाते ती ते या पक्षात आहेत म्हणून. पक्षाला खरा धोका आहे तो यांच्यापासून. सत्ताधारी तर दूरच राहिले.
