scorecardresearch

खोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का? – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल

दशसूत्री हटवणे हा गाडगे बाबांच्या विचाराचा घोर अवमान असून ती विनाविलंब जशीच्या तशी लावण्यात यावी, अशी मागणी ॲड. एडतकर यांनी केली आहे

खोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का? – काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल
काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर

अमरावती : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर  लावण्यात आलेली गाडगेबाबांची दशसूत्री काल-परवा शिंदे सरकारने काढून टाकली. सत्‍तेतील भुकेलेल्यांना खोके आणि उघड्या-नागड्यांना राजवस्त्रे मिळालीत म्हणून या दशसुत्रीचा उद्देशच संपुष्टात आला, असा समज यामागे आहे का, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे. दशसूत्री हटवणे हा गाडगे बाबांच्या विचाराचा घोर अवमान असून ती विनाविलंब जशीच्या तशी लावण्यात यावी, अशी मागणी ॲड. एडतकर यांनी केली आहे

नागपूर अधिवेशनात तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांची दशसूत्री मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येईल, अशी घोषणा केली होती आणि त्यानंतर मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात संगमरवरी फलकात संत गाडगेबाबा यांची दशसूत्री कोरण्यात आली होती, त्याचे समारंभपूर्वक अनावरणही झाले होते. गेले दोन अडीच वर्ष मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ही दशसूत्री सर्वांनाच प्रेरणा देणारी ठरली होती, तथापि काल-परवा शिंदे सरकारने दशसूत्रीचा फलक काढून टाकला.

 ‘दशसूत्री’ऐवजी ‘दहशतसूत्री’ लादण्याचा प्रयत्न

संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांची कर्मभूमी अमरावती असून अमरावतीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे त्‍यांनी तातडीने या बाबीची दखल घ्‍यावी. शिंदे सरकार गाडगेबाबांची दशसूत्री हटवते ही अत्यंत निषेधार्ह बाब असून हे सरकार दशसूत्रीऐवजी ‘दहशतसूत्री’ लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप एडतकर यांनी केला आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या