पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, कोणाची कापणार अशी चर्चा रंगत असताना पक्षाच्या प्रभागाच्या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी होत आहे.महापालिकेच्या प्रभाग फेररचनेचे प्रारूप जाहीर झाल्यानंतर हरकती व सुनावणी नुकतीच आटोपली. दरम्यान, काँग्रेसने देवडिया भवनात इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटप सुरू केले आहे.

भारतीय जनता पक्षाकडून मात्र पंधरा वीस दिवसांपासून उमेदवारांची चाचपणीसाठी विविध भागात प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू केल्यात.दक्षिण पश्चिम, मध्य आणि पूर्व नागपुरात झालेल्या प्रभागाच्या बैठकीत आमच्या प्रभागात बाहेरच्या प्रभागातील नाही आमच्या प्रभागातील स्थानिक कार्यकर्त्यांला संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नेत्यांच्या समोर करण्यात आली. काही इच्छुक कार्यकर्ते अभी नही तो कभी नही अशी ठोस भूमिका घेत आहेत. त्यामुळे वरिष्ठांसमोर स्थानिक कार्यकर्त्यांचे मत विचारात घ्यायचे की नेत्यांचे असा पेच निर्माण झाला आहे. २०१७ मधील निवडणुकीत भाजपचे १०८ उमेदवार निवडून आले होते.

त्यातील अनेक नगरसेवकांना विजयाची अपेक्षा नव्हती. मात्र यंदा अनेक प्रभागात पक्षातील विद्यमान नगरसेवका विरोधात रोष आहे.प्रभाग रचनेत फेरबदलामुळे मध्य, दक्षिण पश्चिम, पूर्व व पश्चिम मतदारसंघात जे प्रभाग भाजपचे बालेकिल्ले मानले जात आहेत, त्यात विजय हमखास होऊ शकतो, अशा प्रभागात काही प्रभागाच्या बाहेरील पदाधिकारी उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तशी मागणी वरिष्ठाकडे केल्याने प्रभागनिहाय बैठकीत बाहेरचा नाही तर स्थानिक उमेदवार द्यावा, अशी मागणी आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांकडूनही केली जात आहे. याबाबत भाजयुमोच्या काही पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.प्रभाग रचनेत काही भागांचे संपुष्टात आलेले अस्तित्व व आरक्षण जाहीर झाल्यावर बेघर होऊ नये म्हणून पक्षातील अनेक नेते सुरक्षित प्रभागाच्या शोधात आहे. तर पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षाकडून व अपक्ष म्हणून लढण्याचीही अनेक कार्यकर्त्यांची तयारी आहे. त्यामुळे उमेदवारांची निवड करताना खरी कसोटी पक्षश्रेष्ठींची लागणार आहे.