चंद्रपूर: काँग्रेस सत्तेपासून दूर राहिली तरच देशात सुख, शांती, समृद्धी नांदू शकते. कारण काँग्रेस सत्तेसाठी जगते तर भाजप राष्ट्रहितासाठी काम करते. त्यामुळे राष्ट्रहित साधायचे असेल, तर काँग्रेसला दूर ठेवा, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात अमेरिकेत भाष्य केले. त्या विरोधात चंद्रपूर येथे भाजप जिल्हा व महानगरतर्फे ‘संविधान बचाओ, काँग्रेस हटाओ’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजप पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुनगंटीवार म्हणाले, ‘काँग्रेस आणि राहुल गांधी हेच देशाचे आणि संविधानाचे खरे शत्रू आहेत. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसने कधीही सन्मान दिला नाही. काँग्रेसनेच डॉ. आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत भाष्य केले आहे. त्यावरून त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असल्याचे सिद्ध होते. देशाला, संविधानाला आणि आरक्षणाला वाचवायचे असेल तर खऱ्या अर्थाने काँग्रेसला हटविले पाहिजे,’ असेही ते म्हणाले.
हे ही वाचा…नागपूर : रोगमुक्तीनंतरही मुक्काम खाटेवरच ,शासकीय रुग्णालयात ……
या आंदोलनात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा दिल्या. काँग्रेसला ओबीसी समाजातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचे बघवत नाही. त्यांचा खरा चेहरा अमेरिकेत गेल्यानंतर समोर आला. देशाच्या विरोधात राहुल गांधी परदेशात बोलतात ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. काँग्रेसने फक्त त्यांच्या लोकांचा सन्मान केला. त्यांना तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायचा नव्हता. आता तर बाबासाहेबांनी दिलेली आरक्षण व्यवस्थाही त्यांना नको आहे. असे असतानाही लोकसभा निवडणुकीत ते जनतेसोबत खोटे बोलले. आता तर त्यांना काय हवे आहे, हे राहुल यांनी आपल्याच तोंडून सांगितले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हे ही वाचा… राहुल गांधींना भाजप घाबरते का ? कॉंग्रेसचा सवाल, नागपुरात आंदोलन
काँग्रेसचे लोक अनुसूचित जाती-जमाती, आदिवासी, बहुजनांना मानत नाहीत. त्यामुळे या मायावी काँग्रेसपासून सावध राहण्याची गरज आहे. हे देशातील खरे रावण आहेत. याच काँग्रेसने बाबासाहेबांना ईशान्य मुंबईतून पराभूत केले.जगात सर्वांत शिक्षित असलेल्या बाबासाहेबांना काँग्रेसने छळले. कारण आपल्यापेक्षा दलित समाज मोठा होईल, याची भीती काँग्रेसला होती, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.