नागपूर : नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याची टीका होत असताना सुनीता गावंडे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाचा (प्रभारी) कार्यभार सोपविण्यात आल्याने पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. दीर्घकाळ पक्षासाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना डावलून ही नियुक्ती करण्यात आल्याची भावना व्यक्त होत असून, या निर्णयाच्या निकषांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
१२ वर्षे जिल्हाध्यक्षपद, कार्यकाळानंतर सक्रियतेवर प्रश्न
सुनीता गावंडे यांनी नागपूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुमारे १२ वर्षांहून अधिक काळ सांभाळली. मात्र, या पदावरून दूर झाल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक कामातील त्यांचा सहभाग कमी झाल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात आहे. पक्षाची आंदोलने, मोर्चे, बैठका आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती फारशी दिसत नसल्याचा दावा काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात पक्षाची संघटना कितपत विस्तारली, याचे मूल्यमापन होण्याची गरज असल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीतील वरिष्ठ नेत्याच्या पाठबळाची चर्चा
गावंडे यांना यापूर्वी जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यात दिल्लीतील काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याची भूमिका महत्त्वाची होती, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे. आता प्रदेश पातळीवरील नियुक्तीमागेही त्याच नेत्याचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पदनियुक्त्या करताना संघटनात्मक योगदान आणि कार्यक्षमतेपेक्षा वरिष्ठ नेत्यांशी असलेली जवळीक महत्त्वाची ठरते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांना संधी कधी?
काँग्रेसमध्ये अनेक महिला कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत योगदान दिले आहे. आंदोलने, मोर्चे, निवडणूक प्रचार आणि पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरील महत्त्वाच्या पदावर त्यांच्यापैकी एखाद्या कार्यकर्तीला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गावंडे यांच्या नियुक्तीमुळे या अपेक्षांवर पाणी फेरल्याची भावना व्यक्त होत आहे. पक्षासाठी प्रतिकूल परिस्थितीतही काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार होणार नसेल, तर संघटनेतील निष्ठेला महत्त्व काय, असा सवाल केला जात आहे.
विधानसभा निवडणुकीतील भूमिकेवरूनही चर्चा
मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे नेते आणि विद्यमान महसूलमंत्र्यांबाबत गावंडे कुटुंबीयांचा मवाळ दृष्टिकोन असल्याची चर्चा होती. संबंधित महिला नेत्या काँग्रेसच्या प्रचारात फारशा सक्रिय नसल्याचा तसेच संघटनात्मक बैठकांमध्ये त्यांची उपस्थिती कमी असल्याचा दावा काही कार्यकर्ते करतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे पुन्हा महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने पक्षातील नाराजी वाढल्याचे सांगितले जाते. निष्क्रियतेचे आरोप असलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे मिळत असतील, तर संघटना मजबूत करण्यासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार, हा प्रश्न आता पक्षश्रेष्ठींसमोर आहे.
