अकोला : लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई १२ जूनला करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी एका पत्राद्वारे ही कारवाई केली.

एकेकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या अकोला जिल्ह्यात काँग्रेस गेल्या काही वर्षांमध्ये रसातळाला गेली. गेल्या ३५ वर्षांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये अकोला मतदारसंघात पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. यंदा नव्या दमाचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांना संधी देण्यात आली. त्यांनी स्वत:ची यंत्रणा कामाला लावून जिंकण्याच्या दृष्टीने लढा दिला. त्यामुळे साडेतीन दशकांमध्ये अकोल्यात प्रथमच काँग्रेस स्पर्धेत येऊन ३५ टक्क्यांवर अधिक मते प्राप्त केली. अंतर्गत गटबाजी, निष्क्रिय व प्रभावहिन नेत्यांमुळे अकोल्यात काँग्रेसच्या पराभवाची परंपरा अबाधित राहिली. पक्षाचा जनाधार मात्र वाढल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यात १९८९ पासून काँग्रेसची प्रचंड वाताहत झाली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार साडेतीन दशकात निवडून येऊ शकला नाही. दोन दशकांपासून जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. विविध नेत्यांच्या गटबाजीमध्ये काँग्रेस विभागली गेली. यावेळेस मात्र चित्र वेगळे होते. ॲड. आंबेडकरांसोबत आघाडी न झाल्याने गेल्या काही वर्षांपासून तयारी करणाऱ्या डॉ. पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. जिल्ह्यात खिळखिळी काँग्रेस व गटातटात विभागलेले पदाधिकारी-कार्यकर्ते लक्षात घेता डॉ. पाटील यांनी प्रचारासाठी स्वत:ची यंत्रणा उभी केली होती. भाजप व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत झाली. त्यामध्ये ४० हजार ६२६ मतांनी भाजपचे अनुप धोत्रे यांनी डॉ. पाटील यांचा पराभव केला. या पराभवाची पक्षपातळीवर कारणमीमांसा केली जात आहे.

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसकडून कारवाईचा बडगा, प्रदेश सचिव निलंबित

या पराभवासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर विरोधी कार्य करण्याचा ठपका ठेवण्यात आला. त्याची गांभीर्याने दखल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली. प्रदेश सचिव गावंडे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम केल्याचे प्रदेश कार्यालयाच्या निदर्शनात आल्याचे स्पष्ट करीत त्यांच्यावर सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अकोल्यातील गावंडे हे शेतकरी जागर मंचाचे पदाधिकारी असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर यांचे निकटवर्तीय आहेत. जिल्ह्यातील आणखी काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माझ्या मूळ गावामध्ये भाजपपेक्षा काँग्रेसला दोन मते कमी पडली. त्यामुळेच त्यांनी कारवाई केली असेल. मात्र, त्यापूर्वी माझी बाजू मांडण्याची संधी काँग्रेस पक्षाने द्यायला हवी होती. – प्रशांत गावंडे, अकोला.