वर्धा : आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहे. विविध राजकीय पक्ष जोमाने तयारीस लागले असून काही आघाड्यांचे जागावाटप वादग्रस्त ठरत आहे. वर्धा मतदारसंघ हा स्थापनेपासूनच काँग्रेस लढवीत आहे. कधीकाळी काँग्रेसचा गढ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्धेने अलीकडच्या काळात कमळाला साथ देणे सुरू केले. परिणामी काँग्रेसचे मित्र आता भाजपशी तुम्ही नाही तर आम्ही लढणार, असा दावा करीत आहे. तुमच्याजवळ लढत द्यायला उमेदवार तरी आहे का, असा सवाल करण्यापर्यंत काँग्रेसला जाहीरपणे हिणावल्या जात आहे. मात्र, दुसरीकडे हा मतदारसंघ हातून निसटण्याच्या भीतीने काँग्रेसजन एकवटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांना सज्ज केले आहे. ते पण शरद पवार यांचा आदेश म्हणत दर दोन दिवसांआड जिल्ह्यात ठिकठिकाणी फिरू लागले आहे. त्यांचे वाढते दौरे काँग्रेस नेत्यांच्या पोटात गोळे निर्माण करीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस समितीने वर्धेची जागा काँग्रेसने सोडू नये, यासाठी वरिष्ठ नेत्यांना गळ घातलीय, तर मुंबईत शेखर शेंडे व शैलेश अग्रवाल यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांनी पक्ष प्रभारी रमेश चेन्नीथला तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन वर्धा मित्र पक्षासाठी सोडू नये, असा आग्रह धरला. या जागेसाठी मित्रपक्ष आग्रही आहे. पण आम्ही तो मान्य करणारच नाही. तरीही ही बाब वाद निर्माण करणारी ठरत असेल तर वर्धेच्या जागेचा प्रश्न दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे नेणार. मुंबईत तडजोड होणार नाही, अशी हमी या नेत्यांनी दिल्याचे शेंडे व अग्रवाल म्हणाले.

हेही वाचा…भंडारा : श्रेय नेमके कुणाचे? “एकाच बायकोचे दोन नवरे,” भूमिपूजन सोहळ्यावरून आजी-माजी आमदारांमध्ये स्पर्धा

जिल्ह्यातील आमदार रणजित कांबळे व माजी आमदार अमर काळे हे या घडामोडींपासून दूर असल्याचे चित्र आहे. ते दोन्ही आग्रही राहिल्यास त्यांच्यापैकी एकाच्या गळ्यात उमेदवारी पडू शकते, अशी चर्चा आहे. दोघेही लोकसभा लढण्यास अजिबात इच्छुक नसल्याच्या घडामोडी आहेत. आता वर्धा कोण लढणार? हाच एक मोठा प्रश्न काँग्रेस आघाडीत उत्सुकतेचा ठरला आहे, तर हर्षवर्धन देशमुख यांनी उमेदवारी गृहीत धरून वर्धेत प्रशस्त घर पाहायला सुरुवात केली आहे.